धक्कादायक ! विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाद्वारे पाठवले घरी; कोथरूडमधील शाळेचा अजब 'प्रताप'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 08:31 PM2020-10-08T20:31:14+5:302020-10-08T20:32:30+5:30
आपल्या पाल्याचा दाखला हातात आल्याचे पाहून पालकांचा संताप उडाला..
पुणे: एसएससी बोर्डाची शाळा बंद करून सीबीएससी बोर्डाची शाळा सुरू करणाऱ्या कोथरूड परिसरातील एका नामांकित शाळेने शेकडो विद्यार्थ्यांचे दाखले रजिस्टर पोस्टाने त्यांच्या घरी पाठवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या पाल्याचा दाखला हातात आल्याचे पाहून पालकांचा संताप उडाला असून आपल्याला कोणी वाली आहे की नाही, अशी उद्विग्न भावना पालक व्यक्त करत आहेत.
सुरुवातीला सर्वसामान्यांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नामांकित शाळेने सुमारे दोन वर्षांपूर्वी एसएससी बोर्डाची शाळा बंद करून सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पालकांनी शाळेच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला. पालकांचे याबाबत मतदानही घेण्यात आले होते.त्यावर सुमारे 80 टक्के पालकांनी विरोध दर्शविला होता.परंतु, पालकांचा विरोध न जुमानता शाळेने चालू शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई बोर्डाचे वर्ग सुरू केले. तसेच पालकांना सीबीएससी बोर्डाच्या वर्गांमध्ये प्रवेश करण्याबाबत आवाहन केले. मात्र अनेक पालकांनी आपल्या पाल्याने सीबीएसई ऐवजी एसएससी बोर्डाच्या शाळेतच शिक्षण घ्यावे, असा आग्रह धरला. अखेर शाळेने संबंधित विद्यार्थ्यांचे दाखले रजिस्टर पोस्टाने विद्यार्थ्यांच्या घरी पाठविले. गेल्या आठवडाभरापासून शंभर ते सव्वाशे विद्यार्थ्यांना दाखले मिळाले आहेत.
---------------------
कोथरूड परिसरातील शाळेने मुलांना रजिस्टर पोस्टाने दाखले पाठवले आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आले असून शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. आता या विद्यार्थ्यांचा वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतो.
- प्रदीप उदागी, पालक