धक्कादायक! लग्न करण्याच्या बहाण्याने घेऊन गेला, अन केला तरुणीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 02:38 PM2021-03-21T14:38:34+5:302021-03-21T15:04:18+5:30
तरुणीशी होते प्रेमसंबंध: दहा वर्षांनंतर गुन्हा दाखल
पिंपरी : प्रेमसंबंध असलेल्या तरुणीशी लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यांनतर लग्न करायचे आहे, असे सांगून ११ सप्टेंबर २०११ रोजी तिच्या घरून आरोपी तरूण तिला घेऊन गेला. मात्र लग्न न करता तिला ठार मारून टाकले. आरोपी तरुणाच्या विरोधात तरुणीच्या खूनप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात २० मार्च २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदणी सत्यवान लांडगे (वय २२), असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिची आई सविता सत्यवान लांडगे (वय ५२, रा. पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर लक्ष्मण घारे (वय ३२, रा.ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी चांदणी ही हिंजवडी येथील कंपनीत कामाला होती. त्यावेळी आरोपी घारे याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. मात्र आरोपीने लग्नास टाळाटाळ केल्याने दोघांमध्ये लग्नाच्या कारणावरून वाद सुरू होते. आरोपी ११ सप्टेंबर २०११ रोजी फिर्यादी यांच्या घरी आला. चल आपण लग्न करूया, असे म्हणून त्याने फिर्यादी यांची मुलगी चांदणीला दुचाकीवरून घेऊन गेला. त्यानंतर फिर्यादीने मुलगी चांदणी व आरोपी च्या मोबाईलवर फोन केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. काही दिवसांनी आरोपी घारेचा फोन लागला. चांदणीसोबत मी लग्न न केल्याने ती मला सोडून निघून गेली, असे आरोपी घारेने फिर्यादीला सांगितले.
चांदणी परत येईल, या अपेक्षेने फिर्यादी तिची वाट पाहत होत्या. परंतु दोन वर्ष झाल्यानंतरही चांदणी घरी परतली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याबाबत २७ जुलै २०१३ रोजी पिंपरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. चांदणी घरातून निघून गेली. त्यावेळी तिच्याकडे पाच ग्रॅमचे सोन्याची कर्णफुले व पायात चांदीच्या दोन पट्ट्या होत्या.
मागील दोन महिन्यांपूर्वी आरोपी गारे हा मारुंजी येथे भाजी विक्री करीत असल्याची फिर्यादी यांना माहिती मिळाली. त्यामुळे आरोपी घारे यांना भेटून फिर्यादीने त्यांची मुलगी चांदणी बाबत त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन चांदणी बाबत काही एक माहिती देण्यास आरोपी घारेने टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादी यांनी तक्रार केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.