धक्कादायक! सिलेंडरमधून गॅसची चोरी; आळंदी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 01:42 PM2021-01-05T13:42:25+5:302021-01-05T13:43:02+5:30
सिलेंडरच्या टाक्या, वाहन व रोख रक्कम हस्तगत
आळंदी : चिंबळी (ता.खेड) येथे सिलेंडरमधून गॅसची चोरी करतानाचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे १२ लाख ८ हजार १६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (दि.३) रात्री साडेसातच्या सुमारास चिंबळी हद्दीत ज्ञानेश्वर महाराज व मोतीराम महाराज गॅस सर्व्हिसिंग स्टील होम रिपेअरिंग सेंटर स्वयंभू भारत गॅस नावाच्या दुकानात उघड झाली. याप्रकरणी विलास भगवान खोंडे (शिंदे), सतीश मनोहर परवत, रवींद्र सातकर व नारायण गवळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रवींद्र सातकर यांनी त्यांच्या गॅस एजन्सीमधून अतिप्रमाणात घरगुती गॅसचा साठापुरवून तसेच अन्य आरोपींशी संगनमत करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असून सुद्धा मानवी जीवितास पोहचणाऱ्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यास तसेच ज्वालाग्राही पदार्थाबाबत पुरेसा इतका बंदोबस्त करणे गरजेचे असताना त्यास जाणीवपूर्वक टाळून, त्यांच्या ताब्यातील घरगुती भरलेल्या सिलेंडरमधून ०४ किलो वजनाच्या सिलेंडरमध्ये गॅस काढून घेऊन गॅसची चोरी केली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून हा प्रकार उजेडात आणत सिलेंडरच्या टाक्या, वाहन व रोख रक्कम हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस नाईक मारुती करचुंडे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.