धक्कादायक! सावकाराने २७ वर्षांच्या तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले;इंदापूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 08:32 PM2021-06-24T20:32:00+5:302021-06-24T20:32:40+5:30
फिर्यादी यांच्याकडे असलेल्या पैशाच्या मोबदल्यात जमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून अंगावर पेट्रोल टाकत त्याला युवकाला जिवंत जाळले.
बाभूळगाव: बेकायदेशार सावकारकीच्या पैशासाठी एकाचा खून करून ३०२ च्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या खासगी सावकाराने एका साथीदाराच्या मदतीने निमगाव केतकी येथील २७ वर्षीय युवकाचे पैशासाठी अपहरण केले. तसेच पैशाच्या मोबदल्यात जमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून अंगावर पेट्रोल टाकत त्याला युवकाला जिवंत जाळल्याची घटना जंक्शन (ता.इंदापूर) फाॅरेस्ट हद्दीत घडली आहे. या घटनेत युवक ९५ टक्के भाजल्याने तीन दिवसांच्या उपचारानंतर युवकाचा मृत्यू झाल्याने आरोपींना तात्काळ बेड्या ठोकत जेरबंद केल्याची माहिती इंदापूरपोलिसांनी दिली.
नवनाथ हणुमंत राऊत (वय३२, रा.निमगाव केतकी, ता.इंदापूर) व सोमनाथ भिमराव जळक (वय३१, रा.इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांना २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर शिवराज उर्फ शिवराम कांतीलाल हेगडे (वय २७, रा. निमगाव केतकी, ता.इंदापूर) असे मयत इसमाचे नाव आहे.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ जुन २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हा निमगाव केतकी हद्दीतील यशराज पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला असता वरील आरोपींनी फिर्यादीला पाठीमागुन बंदुक लावुन, चारचाकी वाहनात बसवत त्याचे अपहरण केले. व तुझ्याकडे आणखी पैसे निघतात असे म्हणून १३ दिवस अज्ञातस्थळी एका खोलीत डांबुन ठेवले. दि.२० रोजी वरील आरोपींनी फिर्यादी शिवराज उर्फ शिवराम हेगडे याला सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जंक्शन फाॅरेस्ट हद्दीत आणत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत पेटवुन दिले आणि त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले.
या घटनेत शरीर पेटल्यानंतर फिर्यादीने जमिनीवर लोळुन आग विझवली. व रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईकांनी त्यांना इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. फिर्यादीच्या शरीराला जास्त भाजल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हील हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.तिथे त्यांच्यावर तीन दिवसांपासून उपचार करण्यात येत होते. त्यादरम्यान फिर्यादीने पोलिसांना लेखी जबाब दिला आहे.परंतु उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाल्याने इंदापूर पोलिसांनी आरोपीवर ३०२ चा गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय धोत्रे हे करत आहेत.
———
आरोपी सावकार या प्रकरणी होता जेलमध्ये...
सोमनाथ भिमराव जळक व फिर्यादी शिवराज उर्फ शिवराम कांतीलाल हेगडे हे एकमेकांचे जवळचे मित्र होते.मागील काही दिवसांपूर्वी या दोघांनी मिळुन सावकारकीच्या पैशासाठी त्यांच्याच एका मित्राच्या डोक्यात दगड घालत त्याचा खून करून मृृृृतदेह निमगाव केतकी येथील विहिरीत फेकून दिला होता. त्यावेळी इंदापूर पोलिसांनी दोघांनाही ३०२ च्या गुन्ह्यात अटक करुन जेलमध्ये टाकले होते. काही दिवसानंतर दोघेही जामिनावर बाहेर आले होते. तर सोमनाथ जळक व नवनाथ राऊत हे सराईत गुन्हेगार व खासगी सावकार असुन त्यांनी अनेक गोरगरीबांच्या शेतजमिनी व जागा व्याजाच्या पैशात बळकावल्याची शक्यता आहे. त्यातुनच सोमनाथ जळकने पैशाच्या जोरावर दुसरा खून केल्याची चर्चा आहे.
————————————————————————