धक्कादायक ... ! आईलाच वेडे ठरविण्याचा प्रयत्न..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 09:37 PM2018-07-02T21:37:42+5:302018-07-02T21:44:40+5:30
एमएससीबीमधून वरिष्ठ पदावरुन निवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ महिलेची ही चित्तरकथा. एकुलता एक मुलगा, सून, नातवंडे असे भरलेले घर. पण वयानुसार त्यांच्यात काहीसा विक्षिप्तपणा आला़...
विवेक भुसे
पुणे : आज ७२ त्या वर्षांच्या आहेत़. अजूनही स्वत: सफाईदारपणे मोटार चालवितात़. त्या काळात मोटारसायकल चालविणाऱ्या शहरातील पहिल्या ४ -५ जणींमध्ये त्यांचा क्रमांक होता़. आजही तितक्याच कणखर आहेत़. पण वयानुसार त्यांच्यात काहीसा विक्षिप्तपणा आला़. त्याला वेडेपणा समजून एकुलत्या एक मुलाने त्यांची रवानगी मांजरी येथील पुनर्वसन केंद्रात केली़. तेथून त्या बाहेर आल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नागरिक कक्षाची मदत घेतली़. पोलिसांनी मुलाला ‘आपल्या भाषेत’ समजावून सांगितल्यानंतर मुलगा त्यांचा सांभाळ करण्यास तयार झाला़. तेव्हा त्यांनी माझ्यानंतर सर्व त्याचेच आहे़ मला काही नको, फक्त प्रेम हवे, अशा शब्दातून आईच्या विशाल ह्दयाची प्रचिती दिली़.
एमएससीबीमधून वरिष्ठ पदावरुन निवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ महिलेची ही चित्तरकथा. एकुलता एक मुलगा सून, नातवंडे असे भरलेले घर. मुलाचा केटरिंगचा व्यवसाय करतो़. वयानुसार आईच्या स्वभावात थोडा विक्षिप्तपणा आला़ पण, मुलाने त्याचा वेगळाच अर्थ काढला़. त्यांना मांजरी येथील पूनर्वसन केंद्रात दाखल केले़ मानसिक रुग्ण समजून त्यांच्यावर उपचार केले गेले़. जवळपास दोन महिने त्या तेथे होत्या़. त्यांच्या भावाला माहिती मिळाल्यानंतर त्यांचा मुलाबरोबर वाद झाला़. त्यांना तेथून घरी आणण्यात आले़. त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे धाव घेतली़ पोलीस आयुक्तालयात त्या स्वत: मोटार घेऊन आल्या होत्या़.
पोलीस निरीक्षक स्वाती थोरात व त्यांच्या सहकारी जयश्री जाधव, गजानन सोनाळकर व इतरांनी त्यांचे समुपदेशन केले़ पण मुलगा काही तयार होईना़, तेव्हा पोलिसांनी त्यांनी त्याला आपल्या भाषेत त्याचा परिणामाची जाणीव करुन दिली़. तेव्हा त्याने आईचा सांभाळ करण्याचे मान्य केले़. मुलाने वेळोवेळी आईच्या खात्यातून पैसे काढले होते़ ते ९८ हजार रुपयेही परत केले़. त्यानंतर पोलिसांनी त्यांना विचारले आजी आणखी काय हवे?, तेव्हा त्या म्हणाल्या, मला आता काही नको, प्रॉपर्टी तर त्याचीच आहे़ त्याने मला कोठेही अशाप्रकारे दाखल करुन नये़ मला केवळ त्यांचे प्रेम हवे आहे़.
याबाबत स्वाती थोरात यांनी सांगितले की, वयोमानानुसार ज्येष्ठांमधील विक्षिप्तपणा वाढतो़. पण ते काही मानसिक रुग्ण नसतात आणि मुलांनीही तसे समजू नये़. या वयात त्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न सर्वांनी करण्याची गरज आहे़. अनेकदा सासूचा सूनेवर राग असतो़. सूनेमुळेच मुलगा आपल्याशी असे वागतो, असे त्यांना वाटते़. पण, इथे त्यांनी सून चांगली असल्याचे सांगितले़. हे तसेच त्यांचे वागणे, बोलण्यावरून त्या मानसिक रुग्ण नसल्याचे जाणविले़. पण ज्येष्ठांचे एकाकी वागणे मुले समजून घेत नाही़.