कात्रज स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकार: कोरोना मृतांच्या नातेवाईकांकडून लुटले जातात ८ ते १० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 05:41 PM2021-03-31T17:41:43+5:302021-03-31T17:44:57+5:30
नातेवाईकांना लाकडावर अंत्यसंस्कार करण्यासाठी केले जात आहे प्रवृत्त
कात्रज : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असाताना मृतांची संख्याही शहरात वाढत आहे. अशा परिस्थितीत कात्रज स्माशानभूमीत मृतांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसत आहे. कात्रज स्माशानभूमीत मृतांच्या भावनिकतेशी खेळ केला जात असून अंत्यविधीच्या सामानाचे अवाजवी दर आकारले जात आहेत.
कात्रज स्माशानभूमीत विद्यूतदाहिनी असताना कोरोनाच्या मृतांचे अंत्यसंस्कार करताना विद्यूतदाहिनीला प्राधान्य दिले जात नाही. मृतदेहांचे मोठ्या प्रमाणावर लाकडांवर आणि पारंपारिक पद्धतीने अंत्यविधी केले जात आहेत. शास्त्रात चालत नाही. विद्युत वाहिनीवर अंत्यविधी केल्यास मोक्ष, शांती मिळणार नाही. अशा गोष्टी सांगून भूलथापा दिल्या जात आहेत. बऱ्याचवेळा विद्युतदाहिनेकडे जाणाऱ्या मृतदेहांना लाकडांवर अंत्यविधी करण्यासाठी परावृत्त केले जाते. एकूण मृतांच्या नातेवाईकांची लयलूट चालू असल्याचे दिसून आहे.
एका दिवसात विद्यूतदाहिनीवर साधारणतः १५ पर्यंत मृतदेह जाळले जावू शकतात. पण लाकूडवाल्यांच्या सांगितल्याने विद्युतदाहिनीकडे मृतदेह जात नाहीत. त्याठिकाणी नातेवाईकांची दिशाभूल केली जात आहे. साधारणतः दिवसाला येणाऱ्या १० ते १२ मृतदेहांपैकी ६ ते ७ विद्युत दाहिनीवर तर ४ ते ५ जाणीवपूर्वक लाकडांच्या साहाय्याने अंत्यविधी केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना ८ ते १० हजारांचा भुर्दंड पडत आहे. स्मशानभूमीच्या जागेतच अंत्यविधीचे साहित्य विक्री करणाऱ्यांनी जागा केली आहे. नातेवाईकांसाठी बसायला असणाऱ्या जागेत बांबू, गौऱ्या, लाकडे इत्यादी साहित्य ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे स्मशानभूमीतील जागा मोठ्या प्रमाणावर काबीज केल्याचे दिसून येते.
राजकीय हस्तक्षेप असल्याने कारवाई होत नाही - मंगलदास माने, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, महापालिका
स्माशानभूमीत मागील १० ते १५ वर्षापासून हे सुरु आहे. आम्ही अनेकवेळा कारवाई करण्याचा प्रयत्न केला. परंतु, राजकीय हस्तक्षेप आडवा येतो. अशावेळी आमच्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. -
विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार मोफत होत असताना एका अंत्यविधीसाठी ८ ते १० हजार रुपये घेणे ही मोठी लूट आहे. कोरोनाचा मृतदेह प्राधान्याने विद्युतदाहिनीवर घ्यायला हवा, मात्र तसे होताना दिसत नाही. प्रशासनाने हे थांबवायला हवे. -
महेश कदम, अध्यक्ष शिवशंभू प्रतिष्ठान