पुण्यात खळबळजनक प्रकार उघड! काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावावरच बोगस मतदान
By राजू हिंगे | Published: May 13, 2024 01:54 PM2024-05-13T13:54:49+5:302024-05-13T13:56:56+5:30
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सेंट मीराज् स्कूलमध्ये मतदानासाठी गेल्यानंतर त्यांच्या नावावर मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...
पुणे :पुणे लोकसभा मतदार संघातील सेंट मीराज् स्कूलमधील मतदान केंद्रावर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिंदे यांनी मतदान अधिकारी यांच्याकडे तक्रार करून चॅलेंज व्होट, फॉर्म भरला, ११७ बी नुसार मतदान केले.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सेंट मीराज् स्कूलमध्ये मतदानासाठी गेल्यानंतर त्यांच्या नावावर मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यांच्या नावावर कोणीतरी अज्ञात व्यक्ती मतदान करून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. परंतु तरीही शिंदे यांना टेंडर व्होट अंतर्गत मतदान करण्याची संधी दिली गेली. परंतु त्याची गणना आपत्कालीन परिस्थितीत केली जाऊ शकते.
अरविंद शिंदे म्हणाले, " मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो होतो. त्यावेळी पोलिंग बूथच्या रजिस्टरमध्ये माझ्या नावावर कोणीतरी मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या संदर्भात मी संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर चॅलेंज व्होट, टेंडर व्होट फॉर्म भरला, ११७ बी नुसार मतदान केले. त्यात त्यांनी बॅलेट पेपर वर मतदान केले".