धक्कादायक: वॉचमनने 'साहब किधर जा रहे हो?' अशी विचारणा केली असता चार गुंडांकडून बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 02:39 PM2021-03-13T14:39:34+5:302021-03-13T14:40:52+5:30
आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई
वॉचमनने 'साहब किधर जा रहे हो?' अशी विचारणा केली असता चार गुंडांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शैलेश टॉवर औंध येथे घडला आहे. फिर्यादी शैलेश टॉवर औंध येथे वॉचमन म्हणून कार्यरत असून त्यांनी चतुरशृंगी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी बिरजुसिंग दुधानी( वय ३७ ), याच्या समवेत बितुसिंग कल्याणी( वय २४ ), सनीसिंग दुधानी आणखी एकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोसायटीच्या गेटजवळ थांबले होते. त्यापासून १०० मीटर अंतरावर एक चारचाकी गाडी थांबली. त्यामधून चार जण बाहेर आले. सोसायटीच्या गेटजवळ आल्यावर वॉचमनला ना विचारता आत जात होते. त्या क्षणी फिर्यादीने साहब किधर जाना है. अशी त्यांना विचारणा केली. तेव्हा त्या चार जणांनी फिर्यादीला मारण्यास सुरुवात केली. चाकू दाखवून " गप बस नाहीतर तुला खल्लास करेल " असे धमकवले. चौघांपैकी एक जण फिर्यादी जवळ चाकू घेऊन थांबला होता. बाकी तिघे सोसायटीत गेले. अर्ध्या तासाने तिघे एक एलईडी टीव्ही घेऊन बाहेर आले. सदर टीव्ही घेऊन जात असताना पोलिसांची दुचाकी येताना पाहून ते स्वतःच्या चारचाकीत बसून निघून गेले. फिर्यादिने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद झाला आहे. तसेच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरोपींना अटक केल्यावर चौघांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. चतुरशृंगी पोलिसांकडून मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
टोळी प्रमुख बिरजुसिंग दुधानी याने टोळी निर्माण करून घरफोडीसारखे गुन्हे केले आहेत. तसेच बेकायदेशीर मार्गाने टोळीचे वर्चस्व, दहशत कायम ठेवून वाहन चोरी, दरोडा, जबरी चोरी, शासकीय नोकरावर प्राणघातक हल्ला असे गंभीर गुन्हे सातत्याने केले आहेत.
कारवाई करण्याबाबत प्रस्ताव चतुरशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण यांना सादर केला होता. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव हे करत आहेत.