धक्कादायक ! पुण्यात क्वारंटाईन सेंटरमध्ये 'पाण्याचा' धंदा; सिंहगड हॉस्टेलमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 07:39 PM2020-05-26T19:39:08+5:302020-05-26T19:48:46+5:30
सिंहगड कॉलेज हॉस्टेलमधील विलगिकरणात असलेल्या नागरिकांना तब्बल २०० रुपये दराने पाण्याचे बॉक्स विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस..
पुणे : एकीकडे शहरातील रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे विलगीकरण कक्षांमधील लोकांची संख्याही वाढत चालली आहे. परंतु, याठिकाणी नागरिकांना अगदीच सुमार दर्जाच्या सुविधा पुरविल्या जात असून पाणी सुद्धा विकत घेऊन प्यायची वेळ आली आहे. सिंहगड कॉलेज हॉस्टेलमधील विलगीकरणात असलेल्या नागरिकांना तब्बल २०० रुपये दराने पाण्याचे बॉक्स विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेने विविध महाविद्यालये, शाळा आणि मंगल कार्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. याठिकाणी कोरोना रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांना ठेवले जाते. त्यांची तपासणी केली जाते. ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येतात त्यांना उपचारार्थ दवाखान्यात हलविले जाते. पालिकेच्या विलगीकरण कक्षांमध्ये सध्या हजारो नागरिक ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये लहान बाळापासून ते वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्या निवसाचीही व्यवस्था विविध ठिकाणी करण्यात आली आहे.
सिंहगड हॉस्टेलच्या विविध इमारतींमध्ये ठेवण्यात आलेल्या नागरिकांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच तक्रारी सुरू केल्या होत्या. याठिकाणी जेवण व्यवस्थित मिळत नसल्याचे 'लोकमत' ने यापूर्वीच निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर काही दिवस जेवण वेळेवर दिले गेले. परंतु, आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती आहे. नागरिकांना रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत जेवण मिळत नाही. एवढे कमी काय, अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या तब्येती सुधारण्याऐवजी बिघडण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाली आहे.
---//------
विलगीकरण कक्षांमध्ये ठेवण्यात आलेल्या नागरिकांना भेटण्यास कोणालाही सोडले जात नाही. एवढेच काय पण अधिकारीही आत जात नाहीत. एवढी काळजी घेतली जात असतानाही पाणी विक्रेते मात्र राजरोसपणे या हॉस्टेलमधील इमारतींमध्ये जाऊन पाण्याच्या बॉटल विकत आहेत. या पाणी बाटल्यांचा दार थोडाथोडका नव्हे तर तब्बल २०० रुपये आहे. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी पाणी बॉक्स विकत घेतले. परंतु, ज्यांनी सोबत पैसे नेलेले नाहीत अशांचे मात्र हाल सुरू आहेत. येथील पाणी अशुद्ध आणि बेचव असल्याने नागरिकांवर पाणी विकत घेऊन प्यायची वेळ आली आहे.
-------------
या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासण्याही करण्यात आलेल्या नाहीत. ज्यांना लक्षणे दिसतील त्यांच्या आणि वयोवृद्ध नागरिकांच्या तपासण्या करण्याच्या सूचना दिलेल्या असल्याची उत्तरे डोकटर्स देत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
---------------
विलगीकरण कक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून झाडलोट होत नाही. तसेच बेसिन, स्वच्छता गृहे प्रचंड घाण झाली आहेत. याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. या अस्वच्छतेमुळे अनेकांना उलटयांचा त्रास सुरू झाला असून त्याचे व्हिडिओही समोर आले आहेत.
----------------
सिंहगड हॉस्टेलमध्ये मागील तीन दिवसांपासून पाणी नीट मिळत नाही. प्यायचे पाणी अशुद्ध असल्याने पाणी विकत घ्यावे लागत आहे. या पाण्यामुळे लहान मुलांना त्रास होतो आहे. बाहेरून लोक येऊन २०० रुपयांना पाणी विकत आहेत. औषधे मिळालेली नाहीत. आरोग्य तपासणी झालेली नाही. प्रचंड अस्वच्छता असून जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. आमच्या तक्रारींकडेही कोणी लक्ष देत नाही. - राकेश आलेटी, नागरिक, भवानी पेठ
------------------
सिंहगड हॉस्टेलमध्ये संस्थेचा आरो प्लान्ट आहे. पाणी शुद्ध असून त्याचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. स्वच्छता ठेवली जात असून ज्यांना आवश्यकता आहे त्यांना औषधे दिली जात आहेत. औषधांची व्यवस्थित माहिती दिली जात आहे. अनेकदा पालिकेचे कर्मचारी नागरिकांना हव्या असलेल्या वस्तू स्वत: नेऊन देतात. काही ठराविक लोकांच्या तक्रारी असल्या तरी अन्य शेकडो नागरिक संतुष्ट आहेत.
- जयंत भोसेकर, उपायुक्त, पुणे महानगरपालिका