धक्कादायक! मुलगा झोपलेला असताना पतीने डोक्यात फरशी घालून केला पत्नीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:00 PM2021-11-24T12:00:43+5:302021-11-24T12:01:07+5:30
मुलाला जाग आल्यावर 'ती आता वाचणार नाही. मी तिच्या डोक्यात फरशी घातली आहे. ती मला मुलीच्या केसमध्ये फसवत होती. म्हणून मी तिला मारले आहे' असे पतीने मुलाला सांगितले.
पिंपरी : पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी घालून खून केल्याची ही घटना मंगळवारी सकाळी साडेचार वाजता उद्यमनगर, पिंपरी येथे घडली. जैनबी अजमुद्दीन चाकुरे (वय ३५, रा. रसरंग चौक, उद्यमनगर, पिंपरी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. अनमुद्दीन अल्लाउद्दीन चाकुरे (वय ३९) असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा आयान अनमुद्दीन चाकुरे (वय १४) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैनबी आणि आरोपी अनमुद्दीन हे पती-पत्नी होते. दोघांमध्ये वाद झाल्याने सहा महिन्यांपासून अनमुद्दीन हा जैनबी यांच्यापासून विभक्त राहत होता. जैनबी, त्यांचा मुलगा आयान आणि मुलगी तमन्ना असे तिघेजण उद्यमनगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. तमन्ना ही मागील काही दिवसांपूर्वी मोहम्मद इलियाज शाह या मुलासोबत पळून गेली होती. त्यानंतर जैनबी यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर तमन्नाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.
अनमुद्दीन हा मागील 15 दिवसांपासून परत जैनबी यांच्यासोबत राहण्यासाठी आला होता. सोमवारी रात्री अनमुद्दीन, जैनबी आणि आयान यांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर अनमुद्दीन आणि जैनबी दोघेजण घराजवळ असलेल्या उद्यानाच्या बाहेर बाकावर गप्पा मारत बसले. त्यावेळी त्यांच्यात भांडणही झाले. रात्री उशिरा जैनबी यांनी झोपण्यासाठी अंथरून टाकले. त्यावेळी अनमुद्दीन जैनबी यांना म्हणत होता की, 'तू मला फसवले आहेस.' रात्री सर्वजण झोपी गेले.
पहाटेच्या वेळी आयान झोपलेल्या पलंगाच्या पायाला धक्का लागला म्हणून आयान उठून बसला. त्याने बघितले तर पलंगाखाली, आजूबाजूला रक्त पडले होते आणि अनमुद्दीन हा जैनबी यांच्या डोक्याजवळ उभा होता. आयानने आई जैनबी यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 'ती आता वाचणार नाही. मी तिच्या डोक्यात फरशी घातली आहे. ती मला मुलीच्या केसमध्ये फसवत होती. म्हणून मी तिला मारले आहे' असे अनमुद्दीन याने आयानला सांगितले.
अनमुद्दीन घरातून बाहेर जाताना त्याने आयानला मामाला फोन करण्यास सांगितले. घाबरलेल्या आयानने अगोदर घर मालकाला सांगितले. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. रुग्णवाहिकेतून जैनबी यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा डॉक्टरांच्या तपासण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.