...त्या रुग्णाचा मृत्य कोरोनामुळेच! आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 02:26 PM2021-05-23T14:26:02+5:302021-05-23T15:07:16+5:30
कोरोनाबाधित महिला रूग्णावर उपचार सुरू असतानाच म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव
बारामती: बारामती येथील एका कोरोनाबाधित महिला रूग्णावर उपचार सुरू असतानाच म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव आढळून आला. दरम्यान या रूग्णावर म्युकरमायकोसिस आजारावर देखील आरोग्य प्रशासनाने कुटूंबियांच्या समंतीने यशस्वी शस्त्रक्रिया केली. उपचारा दरम्यान या रूग्णाचा मृत्यू झाला. मात्र या रूग्णाचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव बारामती परिसरात दिसून येऊ लागला आहे. आतापर्यंत बारामतीमध्ये आजूबाजूच्या तालुक्या व जिल्ह्यांसहित म्युकर मायकोसिसच्या ३६ रूग्णांची उपचार घेतले आहे. त्यामध्ये ७ रूग्ण पुण्याला अन्य रूग्णांना बारामतीमध्ये उपचारानंतर घरी सोडण्यात आले. महिनाभरात बारामतीत म्युकरमायकोसिसच्या १९ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यापैैकी पुण्यात उपचारा घेत असलेले बारामतीतील दोन रूग्ण दगावले आहेत.
सबंधीत महिलेवर तीन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. मात्र कोरोनोमुळे या रूग्णांची ऑक्सिजन पातळी ८० च्या खाली होती. बेशुद्ध अवस्थेतच कुटूंबियांच्या संमतीने म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया पार पडली. मात्र त्यानंतरच्या उपचारास प्रतिसाद न दिल्याने या महिला रूग्णाचा मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले. बारामती कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असताना दुसरीकडे या विषाणूचा संसर्ग आढळून येऊ लागला आहे. म्युकरमायकोसिसची लक्षणे अढळून आल्यास तातडीने रूग्णांनी तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे केले आहे.