धक्कादायक! आंबेगाव येथे तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 08:44 PM2020-11-06T20:44:46+5:302020-11-06T20:50:15+5:30
हा तरुण अंघोळीसाठी विहिरीवर गेला होता. त्याला पोहता येत नव्हते.
मंचर: गावडेवाडी (ता आंबेगाव) येथील माथावस्ती परिसरात विहिरीत तोल गेल्याने एक जण बुडाला असून त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत लागला नव्हता. कृष्णा सखाराम शेळके (वय १८, मूळ रा. परभणी) असे विहिरीत पडलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ ला पाचारण करण्यात आले आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील माथावस्ती परिसरात कृष्णा हा शुक्रवारी सकाळी साडेबाराच्या सुमारास विहिरीत तोल जाऊन पडला आहे. हा तरुण अंघोळीसाठी विहिरीवर गेला होता. त्याला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो बाहेरच आंघोळ करत होता. मात्र तोल जाऊन तो विहिरीत पडला. त्याच्या समवेत एक लहान मुलगी होती. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. हा आवाज ऐकून संबंधित मुलाचे वडील मदतीसाठी धावून आले. वडिलांनाही नीट पोहता येत नव्हते. मात्र मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी धाडसाने विहिरीत उडी घेतली. दुर्देवाने त्यांना मुलाला वाचवता आले नाही. मोटारीच्या पट्ट्याला धरून वडिलांनी तग धरला. मात्र कृष्णा हा तरुण विहिरीच्या पाण्यात बुडाला. विहिरीत पन्नास फूट खोल पाणी असल्याने त्याला शोधण्यासाठी अडचण येत होती. पोहणाऱ्याच्या मदतीने शोध घेण्यात आला. मात्र त्यात यश आले नाही. शेवटी मंचर पोलिसांनी विहिरीच्या पाण्यात कॅमेरा 50 फूट खोल पाण्यात टाकून संबंधित तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो तरुण पाण्यात अडकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंचर पोलिसांनी एनडीआरएफला पाचारण केलेले आहे.अद्यापपर्यंत ही टीम या ठिकाणी आली नसून या परिसरातील नागरिक एनडीआरएफची वाट पाहत आहे. शुक्रवारी तालुक्यात तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.