पुण्यात पाण्यासाठी विद्युतवाहिनीच्या टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 07:37 AM2022-03-11T07:37:00+5:302022-03-11T07:40:09+5:30
समस्यांवर तोडगा काडू, असा विश्वास दिल्यावर ते खाली आले..
हडपसर : पाणी व रस्त्यांसाठी महापालिकेकडे सततचा पाठपुरावा करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने फुरसुंगी, संकेतविहार येथील तरुणाने उच्च दाब विद्युतवाहिनीच्या टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
संकेत विहार येथील श्रीराम पवार (वय ५०) हे स्थानिक नागरी सुविधा मिळण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांकडे चकरा मारीत होते. मात्र, एवढे करूनही सुविधा तर नाहीच; बोलण्यातूनही पण सकारात्मकता नसल्याने पवार यांनी टॉवरवर चढून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
कंट्रोल रूममधून फोन गेल्यानंतर बचावपथकासह अग्निशामक दलाचे वाहन दाखल झाले. हाय टेन्शनच्या टॉवरवर अर्ध्यापर्यंत पवार गेले होते.
अग्निशामक दलाची टीम आल्यावर त्यांना पकडण्यासाठी वर चढत असता ते आणखी वर चढू लागले; त्यामुळे स्थानिक लोकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. समस्यांवर तोडगा काडू, असा विश्वास दिल्यावर ते खाली आले.