कोरोनाला मारा गोळी... आई-वडिलांना काळजी मुलांच्या शिक्षणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:54+5:302021-07-14T04:12:54+5:30

राहुल शिंदे पुणे : कोरोनामुळे राज्यातील बंद शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) केलेल्या ...

Shoot Corona ... Parents care about their children's education | कोरोनाला मारा गोळी... आई-वडिलांना काळजी मुलांच्या शिक्षणाची

कोरोनाला मारा गोळी... आई-वडिलांना काळजी मुलांच्या शिक्षणाची

Next

राहुल शिंदे

पुणे : कोरोनामुळे राज्यातील बंद शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात ५ लाख ६० हजार ८१८ पालकांनी शाळा सुरू करण्यास होकार दर्शविला आहे. तर १ लाख ३० हजार २ पालकांचा शाळा सुरू करण्यास अजूनही विरोध आहे.

लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर आता कोरोनाबद्दलची भीती कमी झाली आहे. त्यातच ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचे होणारे नुकसान पालक गेले दीड वर्षे अनुभवत आले आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची काळजी लागलेल्या सर्वाधिक पालकांनी शाळा उघडण्यास अनुकूलता दर्शवली आहे.

या सर्वेक्षणात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ७३ हजार ८३८ पालक सहभागी झाले होते. राज्यातल्या एकूण ८१.१८ टक्क्यांहून अधिक पालकांना शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. तर राज्यातले केवळ १८.८२ टक्के पालक शाळा सुरू करण्याबाबत अजूनही अनुकूल नाहीत. सर्वाधिक संख्येने असणारा पालकांचा आग्रह पाहता राज्य सरकार आता किमान आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा तरी निर्णय घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील कोरोनामुक्त ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग येत्या १५ जुलैपासून सुरू करण्याबाबत एससीईआरटीतर्फे ऑनलाईन सर्वेक्षण केले. सोमवारी रात्री ११.५५ वाजेपर्यंत या सर्वेक्षणात सहभागी होण्याची मुदत होती. त्यास राज्यातल्या ६ लाख ९० हजार ८२० पालकांनी प्रतिसाद देत मत नोंदवले. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात शहरी भागाइतकाच प्रतिसाद ग्रामीण भागातूनही मिळाला. दोन्ही भागातील प्रत्येकी ३ लाखांहून अधिक पालकांनी सर्वेक्षणात भाग घेतल्याचे सांगण्यात आले. दोन्ही भागातील बहुसंख्य पालक विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठवण्यास अनुकूल असल्याचे यात स्पष्ट झाले आहे.

चौकट

“विद्यार्थी सुमारे दीड वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांना डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत. होत आहेत. शासकीय नियमांचे पालन करून शाळा सुरू करणेच आता योग्य राहील. शासनाने प्रत्येक शाळेसाठी लसीकरणासाठी वेगळी तरतूद केली पाहिजे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करायला हवेत. स्थानिक प्रशासनानेसुद्धा शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी.”

-दिलीप सिंग विश्वकर्मा, अध्यक्ष, महापॅरेंट्स

चौकट

सर्वेक्षणाला सर्वाधिक पालकांचा प्रतिसाद मिळालेले दहा जिल्हे

पुणे- ७३,८३८

मुंबई - ७०,८४२

नाशिक - ४७,२०२

सातारा -४१,२३३

ठाणे - ३९,२२१

अहमदनगर - ३४,०६७

कोल्हापूर - ३०,४३७

पालघर - २३,३३९

सोलापूर - २२,२५४

जळगाव -१८,७८०

चौकट

कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या किती पालकांनी दिले मत

शिशुवर्ग : १९ हजार २७३

पहिली ते पाचवी : १ लाख ६२ हजार १८४

सहावी ते आठवी : २ लाख १५ हजार ५९०

नववी ते दहावी : २ लाख ८६ हजार ९९०

अकरावी ते बारावी : १ लाख ५ हजार ३९२

Web Title: Shoot Corona ... Parents care about their children's education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.