‘शूटिंग पॉइंट’ बंद होणार?
By admin | Published: June 29, 2015 06:37 AM2015-06-29T06:37:50+5:302015-06-29T06:37:50+5:30
घाटमाथ्यावरील खंडाळा या निसर्गरम्य ठिकाणावरील पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र असलेला शूटिंग पॉइंट बंद होण्याच्या मार्गावर आहे.
विशाल विकारी, लोणावळा
घाटमाथ्यावरील खंडाळा या निसर्गरम्य ठिकाणावरील पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र असलेला शूटिंग पॉइंट बंद होण्याच्या मार्गावरून असून, या ठिकाणी खासगी सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून पर्यटकांची अडवणूक करण्याचे प्रकार मागील आठवडाभरापासून सुरू झाले आहेत़
मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील शेकडो चित्रपट व मालिकांचे शूटिंग याच पॉइंटवर करण्यात आले आहे़ ‘आती क्या खंडाला’ या गुलाम चित्रपटातील गाण्यालाही याच निसर्गरम्य ठिकाणाची पार्श्वभूमी आहे. या ठिकाणावरून राजमाची व्हॅली व कर्जतच्या निसर्गरम्य परिसराचे समग्र दर्शन होते. जवळील डोंगरामधून फे साळत वाहणारे धबधबे पर्यटकांना मोहिनी घालतात़ अनेक वर्षांपासून पर्यटकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या ठिकाणावर लोणावळा नगर परिषदेने ‘नेचर झोन’ हे आरक्षणही टाकले आहे़ मात्र ही जागा अद्याप ताब्यात घेण्यात न आल्याने जागामालकांनी या पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावर गेट बसवून सुरक्षारक्षक नेमले आहेत़ मागील आठवड्यात या सुरक्षारक्षकांनी पर्यटकांना पॉइंटवर जाण्यास मज्जाव केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता़ पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद पोहोचल्याने पर्यटकांना या ठिकाणी जाण्यास मुभा देण्यात आली़
वास्तविक, लोणावळा व खंडाळा ही जन्मजात पर्यटनस्थळे आहेत़ पर्यटनस्थळे म्हणूनच या शहरांचा उगम झाला आहे़ विविध राज्यांसह जगभरातील पर्यटक या शहरांना भेट देत असतात़ लोणावळा व खंडाळा या शहरांचे अर्थकारण हे पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे़ असे असताना यापूर्वीही सुरक्षेच्या कारणावरून वलवण धरण व गार्डन पर्यटकांना बंद करण्यात आले़ नगर परिषदेचे आरक्षण असलेली लोणावळा धरणाची चौपाटी मूळ मालकांनी सुरक्षाजाळी लावून पर्यटकांसाठी बंद केली़ भुशी धरणापेक्षाही जास्त प्रसिद्ध असलेला सत्यम-शिवम् धबधबाही मालकीच्या वादात बंद करण्यात आला़ भुशी धरण, लायन्स पॉइंट ही ठिकाणे नगर परिषद हद्दीबाहेर आहेत़ पर्यटन केंद्र अशा प्रकारे बंद होऊ लागल्यास पर्यटन व पर्यायाने शहराच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होणार आहे़ शूटिंग पॉइंट या डोंगरकड्याची मालकी कोणाचीही असली, तरी गत १०० वर्षांपासून हे ठिकाण पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे़ नागरिक व प्रशासनाने एकत्र येत ही स्थळे खुली ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत़
शूटिंग पॉइंट या जागेवर नगर परिषदेचे नेचर झोनचे आरक्षण असले, तरी सदर जागा अद्याप जागेचा मोबदला देऊन ताब्यात घेण्यात आलेली नाही़ त्या जागेची मालकी मूळ मालकाकडेच आहे़ मात्र अशा प्रकारे पर्यटनस्थळ बंद करणे योग्य नाही. याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात येतील़
- गणेश शेटे़, मुख्याधिकारी
मागील १०० वर्षांहून अधिक काळापासून पर्यटकांचे खंडाळ्यातील मुख्य आकर्षण केंद्र असलेल्या शूटिंग पॉइंटची जगभरात ओळख आहे़ डोंगराच्या पठारावरील या भागातून निसर्गरम्य परिसर व धबधबे पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात़ शहराचे अर्थकारणदेखील पर्यटनावर अवलंबून आहे. असे असताना कोणी हे पर्यटनस्थळ बंद करण्याचे कारस्थान करणार असेल, तर आम्ही ते होऊ देणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू. - मच्छिंद्र खराडे़, जिल्हाप्रमुख, शिवसेना