गाळेधारकांना पैसे मिळाले
By admin | Published: April 8, 2016 12:59 AM2016-04-08T00:59:36+5:302016-04-08T00:59:36+5:30
नारायणगाव बसस्थानकालगत असलेल्या ६० गाळेधारकांना अखेर न्याय मिळाला असून, सर्व गाळेधारकांनी स्थानिक नेत्याला दिलेले प्रत्येकी एक लाख रुपये नेत्याने परत
नारायणगाव : नारायणगाव बसस्थानकालगत असलेल्या ६० गाळेधारकांना अखेर न्याय मिळाला असून, सर्व गाळेधारकांनी स्थानिक नेत्याला दिलेले प्रत्येकी एक लाख रुपये नेत्याने परत केल्याने गाळेधारकांमध्ये समाधान व्यक्त केले. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यामुळेच गाळेधारकांमध्ये एकी निर्माण होऊन सर्व गाळेधारकांना रक्कम मिळाली.
नारायणगाव बसस्थानकालगत असलेल्या जुन्नर रोडवर ६० गाळे आहेत. या गाळेधारकांकडून स्थानिक नेत्याने प्रत्येकी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. गाळेधारकांनी पहिल्या टप्प्यात १ लाख रुपये, तर काहींनी २ लाख रुपये दिले होते. ही रक्कम या नेत्याच्या पतसंस्थेत गाळेधारकांच्याच खात्यात जमा
केली व गाळेधारकांच्या चलनावर सेल्फ अशा सह्या घेऊन ती रक्कम काढून घेतली.
ज्या गाळेधारकांनी १ लाखापेक्षा कमी रक्कम दिली, अशा गाळेधारकास जरब बसावी, यासाठी ग्रामपंचायत व स्थानिक गुंड यांच्या माध्यमातून या नेत्याने बाळू व शंकर जाधव यांचा गाळा ताब्यात घेतला. त्यांच्या भांड्याच्या दुकानातील सर्व साहित्य जप्त केले होते. या प्रकारानंतर सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी व गावगुंड एकूण ३१ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाने ६० गाळ्यांच्या जागेची मालकी कोणाची, याबाबत मोजणी केली असता, गाळ्यांची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गाळेधारकांनी दिलेले पैसे बुडणार, असे वाटले होते. याबाबत ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर प्रथम ४५ गाळेधारक एकत्र आले व त्यांनी दिलेल्या पैशाची मागणी केली आणि पैसे न दिल्यास पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगितले.
नेत्याने सर्वांना पैसे देण्याचे
कबूल केले. त्यानुसार, ५ एप्रिलला २३ जणांना, ४ एप्रिलला २० तर आज ७ गाळेधारक असे एकूण ५० गाळेधारकांना घेतलेली रक्कम परत दिली. (वार्ताहर)