पुण्यातील दुकानांची वेळ सात वाजेपर्यंत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:09 AM2021-07-25T04:09:22+5:302021-07-25T04:09:22+5:30
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात येत्या सोमवारी निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ...
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात येत्या सोमवारी निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शनिवारी (दि. २४) पत्रकार परिषदेत सांगितले.
विभागीय आयुक्तालयात शनिवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख या वेळी उपस्थित होते.
मार्केट यार्डातील व्यापारी आणि शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी दुकानांची वेळ वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे दुकानांची वेळ सात वाजेपर्यंत वाढवण्याची मागणी आहे. सध्या सोमवार ते शुक्रवार असे सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू आहेत. वेळ वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले, पुणे शहराचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ ३.९ इतका आहे. सध्या निर्बंध हे तिसऱ्या स्तरावरचे आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून त्यादृष्टीने काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले आहेत. शासनाने दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णवाढीपेक्षा तिसऱ्या लाटेत दीडपट रुग्ण होण्याचा अंदाज ठेवून खाटांचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना काही सवलती देण्याचा विचार सुरू आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सवलत दिल्याने ज्यांनी लस घेतली नाही ते लस घेण्यास पुढे येतील, असा आशावाद त्यांनी या वेळी व्यक्त केला.
चौकट
जिल्ह्यात ५५ लाख लोकांचे लसीकरण
जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. कोविड लसीकरणात ५५ लाखांचा टप्पा पार केला. एका दिवसात एक लाखाहून अधिक लसीकरणही जिल्ह्याने पूर्ण केले आहे. मात्र, लस उपलब्धता त्या तुलनेत कमी असल्याने लसीकरणाला गती देता येत नाही, लस उपलब्धतेसाठी सातत्याने राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असून अधिकाधिक लसीकरण वाढीचा सातत्याने प्रयत्न आहे.