आॅनलाईन खरेदीमुळे दुकानदारांचं दिवाळं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:37 AM2018-11-14T01:37:20+5:302018-11-14T01:37:54+5:30
आकर्षक आॅफर, एका क्लिकवरचा परिणाम : खरेदीचे प्रमाण २५ ते ४० टक्क्यांनी घटले
पुणे : यंदाच्या दिवाळीमध्ये ग्राहकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत आॅनलाईन खरेदीला पसंती दिल्याने आॅफलाईन खरेदीचं अक्षरश: दिवाळं निघालं. आकर्षक आॅफर, एका क्लिकवर वस्तू निवडण्याचे स्वातंत्र्य, घरपोच सेवा यामुळे ग्राहकांनी कपडे, फर्निचरपासून अगदी इलेक्ट्रॉनिक वस्तूही आॅनलाईन स्वरुपात खरेदी करायला पसंती दिली. आॅनलाईन खरेदीच्या वाढत्या प्रस्थाने स्थानिक दुकानदारांना मोठा फटका बसला. प्रत्यक्ष खरेदीचे प्रमाण सुमारे २५ ते ४० टक्क्यांनी घटले.
सध्याचा जमाना स्मार्टफोनचा आणि तंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे एका जागेवर बसून, विविध आॅनलाईन खरेदीच्या संकेतस्थळांवर शोधाशोध करून आपल्या आवडीची वस्तू एका क्लिकवर खरेदी करायला ग्राहकांची, विशेषत: तरुणाईची पसंती असते. ऐन दिवाळीत बाजारपेठांमध्ये होणारी प्रचंड गर्दी, वेळ आणि पैशांचा अपव्यय, दर कमी करून घेण्यासाठी करावी लागणारी घासाघीस हा सर्व त्रास टाळण्यासाठी यंदा बहुतांश ग्राहकांनी आॅनलाईन खरेदीला झुकते माप दिले. गेल्या सहा ते आठ वर्षांमध्ये आॅनलाईन खरेदीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. दोन वर्षांपूर्वी नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर डिजिटल व्यवहारांवर भर देण्यास सुरुवात झाली. आॅनलाईन खरेदीमध्ये प्लॅस्टिक मनीचा वापर शक्य होत असल्याने अनेक वस्तूंची खरेदी याच माध्यमातून करण्यात आली.
अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा संकेतस्थळांनी सणासुदीचा मुहूर्त साधून ग्राहकांना घसघशीत योजना, आकर्षक पॅकेज उपलब्ध करून देण्यावर भर दिला. क्रेडिट कार्डवर वस्तूच्या एकूण किमतीच्या दहा ते वीस टक्क्यांपर्यंत सूट, नो कॉस्ट ईएमआय, एक्स्चेंज पॉलिसी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्याने ग्राहक आॅनलाईन खरेदीकडे खेचले गेले. आतापर्यंत प्रामुख्याने कपडे, अॅक्सेसरीज यांची आॅनलाईन खरेदी करण्यावर भर दिला जात होता. यंदा अगदी फर्निचरपासून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही संकेतस्थळांवरून खरेदी झाली. दिवाळीच्या काळातील सुटीचा लाभ घेत ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, मॉल, सुपर मार्केट अशा ठिकाणी जाऊन विविध ब्रँडच्या वस्तू, कपडे यांची प्रत्यक्ष किंमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष दुकानातील दर आणि आॅनलाईन दर यांची तुलना करून अनेकांनी खरेदीचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. दुकानांमध्ये यंदा आकर्षक योजना, सूट यांचे प्रमाण तुलनेने कमी पाहायला मिळाल्याचे ग्राहकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सध्याच्या इंटरनेटयुगात जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्यामुळे आॅनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये आॅनलाईन खरेदीवर चांगल्या आॅफर मिळाल्या. त्यामुळे सुमारे ५०,००० रुपयांची खरेदी आॅनलाईन पद्धतीने केल्याचे ग्राहक बलविंदर सिंग यांनी अधोरेखित केले.
यंदा प्रथमच ग्राहकांनी फर्निचरसाठी आॅनलाईन खरेदीचा पर्याय निवडल्याचे पाहायला मिळाले. मात्र, इतर वस्तूंच्या तुलनेत फर्निचर आॅनलाईन साईटवरुन विकत घेणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. कारण, फर्निचर खरेदी करताना लाकडाचा दर्जा, टिकाऊपणा यावर जास्त भर दिला जातो. टीव्ही युनिट, शू रॅक, टीपॉय यांसारख्या वस्तूंची आॅनलाईनला किंमत कमी असल्याचे ग्राहकांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात वस्तू बनवून घेण्यावरच भर दिला.
- संतोष कागदे, फर्निचर व्यापारी
सध्या तरुणांमध्ये आॅनलाईन खरेदीची जास्त क्रेझ आहे. त्यातच दिवाळीत आॅनलाईन साईट्सकडून अनेक वस्तूंवर आॅफर देण्यात आल्याने अनेकांनी मॉल किंवा शोरूममध्ये न जाता आॅनलाईन खरेदी करण्यावर जास्त भर दिला. यामध्ये मोबाईल आणि लॅपटॉपला जास्त मागणी होती.
ग्राहक आॅनलाईन खरेदीकडे वळल्याने यंदा दुकानातील विक्रीला सुमारे ४० टक्के इतका फटका बसला. संकेतस्थळांवर आकर्षक आॅफर मिळाल्याने ग्राहक तिकडे वळले. प्रत्यक्षात आॅनलाईन संकेतस्थळांवर वाढीव एमआरपी लावून त्यामध्ये डिस्काऊंट जाहीर करून ग्राहकांची फसवणूक होते. मात्र, ग्राहक केवळ मिळत असलेल्या घसघशीत सुटीवर लक्ष केंद्रित करतात. १२५ रुपयांच्या कुकरची किंमत २९० रुपये इतकी एमआरपी लावून दाखवली जाते. त्यावर सूट जाहीर करून तो १५० रुपयांना विकला जातो. मात्र, यामुळे दुकानांमध्ये होणाºया प्रत्यक्ष खरेदीला फटका बसतो. याबाबत लवकरच व्यापारी महासंघाची बैठक घेऊन ठोस पावले उचलली जाणार आहेत. एलजी, सोनी, फिलिप्स यांसारख्या मोठ्या कंपन्या आॅनलाईन संकेतस्थळांना कमी किमतीने वस्तू देत असल्याने त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे.
- मिठालाल जैन, इलेक्ट्रॉनिक व्यापारी
ग्राहकांनी आॅनलाईन खरेदीला पसंती दिल्याने कापड व्यवसायाला १५ ते ४० टक्के इतका फटका बसला. आॅनलाईन खरेदीचा यंदा खूप मोठा प्रभाव जाणवला. दुकानांमधील आकर्षक योजनांकडेही ग्राहकांनी पाठ फिरवली. लोकांकडे पैसे असूनही आॅफलाईन खरेदीचे प्रमाण कमी झाले.
- दिनेश जैन, कापड व्यापारी