दुकानदारांनीच केले दहाचे नाणे बाद
By admin | Published: June 25, 2017 04:55 AM2017-06-25T04:55:40+5:302017-06-25T04:55:40+5:30
दहाचे नाणे चलनात नसल्याची भीती नागरिकांमध्ये असून, तशी स्थितीही बाजारात आहे
मंगेश पांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : दहाचे नाणे चलनात नसल्याची भीती नागरिकांमध्ये असून, तशी स्थितीही बाजारात आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा, शासकीय यंत्रणा या ठिकाणी दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. खासगी दुकानांमध्ये मात्र या चलनांना कसलीही किंमत नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले.
खिशात दहाचे नाणे आहे. मात्र, ते चलनातच येत नसल्याने अनेकांची तारांबळ उडते. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे जवळ ठेवायचे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडतो. बँकांकडून कसल्याही सूचना नसताना दुकानदारांकडून दहा रुपयांचे नाणे नाकारले जात आहे. त्यामुळे दहाच्या नाण्यांचे काय करायचे, असा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहत आहे.
दहा रुपयांचे नाणे चलनातून हद्दपार झाल्याची अफवा पसरविली जात आहे. यामुळे दुकानदारदेखील नाणी स्वीकारत नाहीत. पीएमपी बस, एसटी बस, रेल्वे यासह मेडिकल, पेट्रोल पंप येथेही नाणे स्वीकारले जात नसल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, लोकमतने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये या ठिकाणी नाणे स्वीकारले गेले, तर दुसरीकडे खासगी दुकानदारांनी मात्र दहाचे नाणे बाद ठरविले.
पेट्रोल पंप, चिंचवड स्टेशन
चिंचवड स्टेशन येथील पेट्रोल पंपावर प्रतिनिधीच्या दुचाकीमध्ये ६० रुपयांचे पेट्रोल टाकले. यामध्ये पन्नास रुपयांची नोट आणि दहा रुपयांचे एक नाणे असे एकूण ६० रुपये दिले. पंपावरील कर्मचाऱ्याने नाणे स्वीकारून पेट्रोल दिले.
महत्त्वाच्या सेवा पुरविणाऱ्या संस्थांच्या ठिकाणी दहा रुपयांची नाणी स्वीकारली जात असताना किराणा दुकानदार, दूधविक्रेते, हॉटेल यासह इतर दुकानदारांकडून नागरिकांची अडवणूक केली जात आहे. हे नाणे चलनातून हद्दपार झाले असल्याचे सांगितले जाते. ही बाब स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली.
आरक्षण खिडकी
प्रतिनिधी : पंढरपूरला जाण्यासाठी उद्याचे तिकीट आरक्षित करायचेय.
एसटी कर्मचारी : किती जणांचे अन् कोणत्या वेळेचे?
प्रतिनिधी : उद्या सायंकाळी साडेसातचे, दोन जणांचे.
एसटी कर्मचारी : एका व्यक्तीचे २४६ होतील.
प्रतिनिधी : ठीक आहे. काही दहा रुपयांची नाणी आहेत, चालतील का?
एसटी कर्मचारी : चालतात की; नाणी न घेतल्यास शिक्षेची तरतूद आहे.
कॅन्टीन
प्रतिनिधी : एक चॉकलेट हवंय.
कॅन्टीनचालक : दस रुपये का है.
प्रतिनिधी : ठीक है. दस का कॉईन है.
कॅन्टीनचालक : दस का कॉईन अब कहॉ
चलता है.
प्रतिनिधी : यहॉँ के टिकट घर में तो दस कॉईन लेते है.
कॅन्टीनचालक : उधर लेते होगे हमारे इधर नही चलता.
पिंपरीतील
किराणामाल दुकान
प्रतिनिधी : एक साबण हवाय.
दुकानदार : दस रुपये दो.
प्रतिनिधी : दस का कॉईन है.
दुकानदार : दस का कॉईन बंद हो गया. ये नही चलता.
प्रतिनिधी : शेठजी, कॉईन चलता है.
दुकानदार : हमारे इधर नही चलता.
पिंपरी रेल्वेस्थानक, तिकीट खिडकी
प्रतिनिधी : तळेगावला जाण्यासाठी तिकीट हवंय.
महिला कर्मचारी : पाँच रुपये होता है.
प्रतिनिधी : दस रुपये का कॉईन है.
महिला कर्मचारी : चलेंगा दे दो.
पीएमपी प्रवास वल्लभनगर ते पिंपरी
प्रतिनिधी : पिंपरीला जायचे आहे, तिकीट किती?
वाहक : दहा रुपये.
प्रतिनिधीने दहा रुपयांचे नाणे देताच वाहकाने नाण्याबाबत कसलीही चर्चा न करता वल्लभनगर ते पिंपरीचे तिकीट हातात सोपविले.
पिंपरीतील भाजी मंडईतही दहाचे नाणे स्वीकारले जात नसल्याचे दिसून आले. नाणे स्वीकारण्यास भाजीविक्रेत्यांकडून नकार दिला जात आहे. दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याने ते घेतले जात नसल्याचे ग्राहकांना सांगण्यात येते. यामुळे ग्राहकांची परवड होते.