दुकानदारांची ऑनलाईन व्यवहाराऐवजी कॅशला पसंती ; नागरिकांसाठी डाेकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 01:38 PM2020-04-05T13:38:14+5:302020-04-05T13:39:30+5:30
काेराेनाचा प्रसार माेठ्याप्रमाणावर हाेत आहे. अशावेळी अनेक दुकानदार नागरिकांकडून ऑनलाईन पेमेंट ऐवजी कॅश देण्यास सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांची अडचण हाेत आहे.
पुणे : देशभर कोरोनाच्या संकटाने नागरिक त्रस्त झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूच्या खरेदी विक्रीचे व्यवहार वगळता इतर सर्व ठप्प आहे. जीवघेण्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अधिक व्यवहार कॅश ऐवजी ऑनलाइन पद्धतीने होणे गरजेचे असताना काही दुकानदारांचा अट्टाहास "कॅश" घेण्याकडे अधिक आहे. त्यामुळे नागरिकांच्या डोकेदुखीत आणखी भर पडली आहे. एकीकडे पुरेशी कॅश जवळपास नसताना दुकानदार ऑनलाइन व्यवहार करण्यास का टाळाटाळ करत आहेत? असा प्रश्न ते दुकानदार, व्यापारी विचारत आहेत.
शहरात सध्या केवळ जीवनावश्यक वस्तू तसेच किराणा व भुसार मालाची दुकाने सुरू आहेत. त्या वस्तू खरेदी करताना अनेकदा नागरिकांकडे पुरेशी कॅश नसल्याने ते पेटीएम, गुगल पे, क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करत आहेत. मात्र यात काही दुकानदार त्यांच्याकडे कार्ड स्वॅप करण्यासाठी पोस मशीन असताना देखील ते बंद असल्याचे कारण देत आहेत. केवळ कॅश स्वीकारली जाईल असे बजावत आहे. यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना कन्झ्युमर अडव्हॉकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एड. ज्ञानराज संत म्हणाले, पैसे हाताळण्यापेक्षा ग्राहक आणि दुकानदार यांनी ऑनलाइन व्यवहाराला प्राधान्य द्यावे. निदान सध्याच्या काळात दुकानदार, व्यापारी यांनी ग्राहकांचे हित लक्षात घेण्याची गरज आहे. ग्राहकांनी देखील जास्तीतजास्त ऑनलाइन खरेदी व्यवहार करावा. सगळ्याच नागरिकांकडे पुरेशा प्रमाणात कॅश असते असे नाही. मात्र त्यांच्या पेटीएम किंवा गुगल पे यात पैसे असल्याने ते त्या माध्यमातून व्यवहार करू शकतात. पण यात दुकानदाराकडून सहकार्याची अपेक्षा आहे. त्यांच्या अडेलतट्टू भूमिकेतून काही साध्य होणार नाही. ग्राहकांनी देखील आपला पिन क्रमांक याविषयी काळजी घ्यावी. अकाउंट व्यवस्थित लॉग आउट करावे. तसेच पिन ऐवजी ओटीपीचा वापर करावा. आपली फसवणूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे. चीन सारख्या देशात काही दिवसांपूर्वी नोटा या सॅनिटाइज करण्यात आल्या. तेव्हा आपण अधिक सजग होण्याची गरज आहे.
ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक म्हणाले, आम्ही क्रेडिट आणि डेबिट याशिवाय इतर सर्व ऑनलाइन व्यवहार सुरू ठेवले आहेत. अद्याप काही व्यापाऱ्यांना ऑनलाइन व्यवहार याबद्दल फारशी माहिती नाही. आता ते का विरोध करत आहेत हे माहिती नाही. क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यानंतर त्यात काही तूट दुकानदाराना सहन करावी लागत होती. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांसाठी त्यात सवलत देण्यात आली आहे. असे असताना ते करायला काहीच हरकत नाही. क्रेडिट कार्डला कमिशन द्यावे लागते. असा समज दुकानदारांच्या मनात आहे. तो त्यांनी दूर करावा.
देश संकटात असताना त्यात सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. अशावेळी दुकानदार, व्यापारी यांनी आपली भूमिका समजून घ्यावी. दुकानदारांनी कार्ड स्वीकारून ग्राहकांना वस्तू द्याव्यात. असे आवाहन त्यांना आहे. ग्राहकांची अडवणूक करू नये. सगळे सुरळीत पार पडावे यासाठी केवळ दुकानदारच नव्हे तर नागरिकांनी देखील प्रयत्न करायला हवेत. संकटाच्यावेळी समंजसपणा दाखवावा. काहींच्या चुकीच्या वागण्याचा फटका हा सगळयांना सहन करावा लागत असल्याने योग्य ती काळजी घ्यावी.
- पोपटराव ओस्तवाल (अध्यक्ष, पुना मर्चंट चेंबर)