खरेदी केलेली पुस्तके धूळ खात; विद्यार्थी संतप्त
By admin | Published: July 29, 2016 03:50 AM2016-07-29T03:50:38+5:302016-07-29T03:50:38+5:30
महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या येथील स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रातील विद्यार्थी गेल्या चार वर्षांपासून संदर्भ ग्रथांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र वेगवेगळी कारणे
निगडी : महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या येथील स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रातील विद्यार्थी गेल्या चार वर्षांपासून संदर्भ ग्रथांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र वेगवेगळी कारणे देऊन प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या शहरातील विद्यार्थ्यांच्या सोईसाठी तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी महापालिकेमार्फत शहरामध्ये विविध ठिकाणी अभ्यासकेंद्र सुरू केली होती. विविध स्तरांमधून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया घेऊन त्यांची नोंदणी करूनच आपण पुस्तके देऊ, एवढे एकच कारण गेल्या चार वर्षांपासून प्रशासनाकडून दिले जात आहे. मात्र आजपर्यंत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया घेतली गेली नाही आणि नोंदणीही करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी आणखी पुस्तके खरेदी करण्यात आली आहेत. मात्र आजपर्यंत लाखोंची ही सगळी पुस्तके धूळ खात पडली आहेत. त्यातील अनेक पुस्तकांच्या आवृत्त्या जुन्याही झाल्या आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे संदर्भ ग्रंथ सामान्य परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. मात्र प्रशासनाकडे पुस्तके असूनही ती अभ्यासासाठी दिली जात नसल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
तसेच या ठिकाणी असणाऱ्या पार्किंगमधून अनेक मुलांच्या सायकली चोरीला गेल्या आहेत. स्वच्छतागृहाची स्वच्छता नीट केली जात नसल्याची तक्रारही मुला-मुलींकडून होत आहे. अशा त्रासाने अनेक मुलांना खासगी अभ्यासिकांमध्ये प्रवेश घ्यावा लागला आहे. या अभ्यास केंद्रातील आतापर्यंत ३२ तरूण -तरूणी वेगवेगळया खात्यांमध्ये अधिकारी पदावर नियुक्त झाले आहेत. त्यामुळे या अभ्यास केंद्रामध्ये गर्दी वाढत आहे.
सहायक कक्ष अधिकारी आणि
कर सहायक या दोन परिक्षा जवळ आल्या असल्याने रविवारीही अभ्यासकेंद्र सुरू असावे, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)
काही दिवसांपूर्वी या अभ्यासकेंद्रातील कर्मचारी मनमानी पद्धतीने अभ्यास केंद्राला सुटी देत असे. यासंदर्भात एका विद्यार्थ्याने सारथीवर तक्रार केली होती. याचा राग मनात धरून कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून रविवारी साप्ताहिक सुटीच जाहीर करुन टाकली. शिवाय माझी तक्र ार करता काय, मी कोण आहे, हे दाखवूनच देतो, असा दमही विद्यार्थ्यांना दिला होता. त्यामुळे विद्यार्थी तक्रार द्यायला घाबरतात.