दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठ फुल्ल
By admin | Published: November 9, 2015 01:48 AM2015-11-09T01:48:37+5:302015-11-09T01:48:37+5:30
दिवाळी साहित्य खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारपेठांसह उपनगरातील बाजार रविवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी नागरिकांनी फुलून गेला होता.
पिंपरी : दिवाळी साहित्य खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारपेठांसह उपनगरातील बाजार रविवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी नागरिकांनी फुलून गेला होता. दिवसभर येथील रस्ते फुलून गेले होते. रहदारी संथ होऊन वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दिवसभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे आर्थिक तज्ज्ञांनी सांगितले.
धनत्रयोदशी व यम दीपदान सोमवारी आहे. पिंपरी, चिंचवड या मुख्य बाजारपेठेसह भोसरी, सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, आकुर्डी, निगडी, पिंपळे सौदागर, इंद्रायणीनगर, शाहूनगर आदीसह उपनगरातील बाजारात दिवसभर गर्दी होती. त्याचबरोबर शेजारच्या खडकी, देहूरोड बाजारपेठ आणि मावळ्यातील मुख्य गावातील बाजार नागरिकांनी फुलून गेला होता. सकाळपासून नागरिकांची पावले बाजारपेठेत वळली होती. फुले, हार, हळद-कुंकू, पणती, अगरबत्ती पूजेचे साहित्य, आकाशकंदील, फटाके, तयार किल्ले, खेळणी- मावळे, रोषणाईचे माळा आदी साहित्य खरेदी जात होते. दुकानाबरोबरच रस्त्यावरील विक्रेत्यांकडूनही मोठ्या प्रमाणात या साहित्याची खरेदी केली जात गेली.
याचबरोबर तयार फराळ आणि मिठाईला पसंती दिली जात होती. स्वीट मार्टमध्ये फराळाचा पाकीटांना मागणी वाढली आहे. मिठाई सोबतच सुका मेवाचे आकर्षक पाकीटे आणि बॉक्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. स्वीट मार्ट चालकांनी दुकानासमोर मांडव टाकून यांची स्वतंत्र केंद्र तयार केले होते. कपडे घेण्यासाठी रेडिमेड कापड दुकानात नागरिकांनी सहकुटुंब गर्दी केली
होती. बालगोपाळांचा उत्साह
दांडगा होता. इलेक्ट्रॅनिक्स साहित्य खरेदीस नागरिकांनी प्राधान्य दिले. एईडी टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, फ्रिज आदी साहित्यांना मोठी
मागणी होती. अलंकार खरेदीसाठी शहरातील सर्वच सराफी दुकानात ग्राहकांची गर्दी होती.
दरम्यान, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे माहिती असूनही प्रशासकीय यंत्रणेने वाहन पार्किंगची कोणतीही व्यवस्था केली नाही. तसेच ग्राहकांनीही रस्त्यावर वाहने उभी केली. अनेक दुकानदारांनीही रस्त्यावर मालकी हक्क सांगितल्याने ग्राहकांना त्रास झाला. गेल्या अनेक वर्षे येथे वाहतूककोंडीचा प्रश्न प्रलंबित आहे. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने ही समस्या कायम आहे. येथील वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी मार्ग काढावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)