नसरापूर येथे अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:24+5:302021-04-07T04:11:24+5:30
राजगड पोलिसांनी शिंदेवाडी, वेळू, शिवापूर बाग, शिवापूर, नसरापूर, कापूरहोळ, किकवी, सारोळा आदी बाजारपेठांतून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पालन करून अत्यावश्यक ...
राजगड पोलिसांनी शिंदेवाडी, वेळू, शिवापूर बाग, शिवापूर, नसरापूर, कापूरहोळ, किकवी, सारोळा आदी बाजारपेठांतून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पालन करून अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने इतर दुकाने बंद केली. मात्र दुकानदारांना या बंद आदेशापूर्वी कोणतीही सूचना व माहिती न दिल्याने दुकानदार व नागरिकांनी नाराजीचा सूर काढून निषेध व्यक्त केला.
या आदेशान्वये अत्यावश्यक सेवांमध्ये हॉस्पिटल, रोगनिदान केंद्रे, दवाखाने, मेडिकल दुकाने, कंपन्या, किराणा दुकाने, डेअरी, बेकरी, भाजीपाला, फळे, मिठाई ,खाद्यपदार्थांची दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, माॅन्सूनपूर्वी करण्यात येणारी कामे,पेट्रोलियम संबंधित उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, मालाची वस्तूंची वाहतूक या सेवांचा समावेश आहे. मात्र अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने शनिवार, रविवार बंद ठेवावी लागणार आहेत.
केंद्रशासनाच्या निर्देशानुसार कंपनी, दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर १५ दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम मोडणा-या व्यक्तीकडून १ हजार रुपये दंड घेण्यात येईल ,असे नसरापूरसह इतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावोगावी ध्वनिक्षेपकावरून सांगण्यात आले.
नसरापूर (ता. भोर) येथील बाजारपेठेत प्रशासनाने दिलेल्या अचानक बंद या निर्णयाविरोधात आजच्या दिवसाकरीता अनेक व्यावसायिकांनी निषेध करीत दुकाने बंद ठेवली.