सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे दुकानांना आग, तीन दुकाने आगीत भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 10:59 AM2022-07-24T10:59:40+5:302022-07-24T11:00:41+5:30
केंद्रीय जल व संशोधन केंद्राच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आली होती दुकाने.
धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी फाट्याजवळ अनधिकृत दुकानांना आग लागल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. गॅस गळतीमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी फाटा येथे केंद्रीय जल व संशोधन केंद्राच्या जागेवर अनधिकृतपणे दुकाने थाटून ती दुकाने भाड्याने देण्याचे प्रकार सुरू आहेत. अशातच रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येथे असणाऱ्या श्रीनाथ स्विट होम, महाराष्ट्र मटन शॉप व सायबा अमृततुल्य या दुकानांना अचानकपणे आग लागली. या आगीत या तीनही दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही दुकाने केंद्रीय जल व संशोधन केंद्राच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान पहाटे या दुकानांना आग लागल्याचे एका नागरिकाने अग्निशमन दलाला सांगितले. त्यानंतर पीएमआरडीएच्या नांदेड सिटी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी पोहचून आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.