वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किट; सासवड शाखेच्या दि डेक्कन मर्चंट को - ऑपरेटिव्ह बॅंकेला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 05:28 PM2023-08-22T17:28:15+5:302023-08-22T17:28:32+5:30
साधरणतः दीड तासानंतर आग आटोक्यात आली
सासवड: सासवड येथील दि.डेक्कन मर्चंट को -आॅपरेटिव्ह बॅकेंच्या पावणेदोन महिन्यापूर्वी स्थलांतरीत झालेल्या शाखेला वातानुकुलीत यंत्रणेत शाॅर्टसर्कीट होवून लागलेल्या आगीत शाखा जळून भस्मसात झाली आहे. मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजलेच्या सुमारास या बँकेच्या सोपाननगर रस्त्यावरील स्थलांतरीत केलेल्या नव्या शाखेला आग लागली. आग लागल्यानंतर सासवड पोलिसांनी सासवड व जेजूरी नगरपरिषदेच्या अग्नी शमन यंत्रणेच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणली. या लागलेल्या आगीमुळे बँकेतील सर्व साहित्य जळून गेलं आहे. यामध्ये मनुष्यहानी झाली नाही बँकेच्या नुकसानी बाबत संपूर्ण माहिती मिळाली नाही. मात्र बँकेतील फर्नीचर, इलेक्ट्रीक साधने, कागद पत्रांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.
डेक्कन मर्चंट बँकेचे शाखा अधिकारी तुषार पवार यांनी याबाबत सांगितले., सकाळी साडेनऊ वाजता बँक उघडली. त्यानंतर काही मिनिटातच वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किट झाला आणि धूर निघाला त्यानंतर आग लागून पुढील घटना घडली. संत सोपान नगर रस्त्यावरील झेंडे बिल्डिंगमध्ये नुकतेच स्थलांतर बँकेचे झाले होते. ही घटना घडल्यानंतर सासवड पोलिसांनी एसटी बसस्थानकाकडून सोपाननगरला जाणारा रस्ता काही काळ बंद केला होता. दरम्यान आग लागल्यानंतर बँकेचे अधिकारी यांनी सासवड पोलीस स्टेशनला माहीती दिली व नगरपालिकेत अग्निशामक बंब मागितला. परंतु सासवड नगरपालिकेचा अग्निशामक बंब दुरुस्तीला गेला असल्याने उपलब्ध झाला नाही. त्यामुळे सासवड नगरपालिकेचे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांनी जेजुरीचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगवले यांना संपर्क करून त्या नगरपालिकेचा अग्निशामक बंब मागितला. तो त्यांनी अवघ्या २५ मिनिटात बँकेजवळ पोहोचविला. त्यामुळे साधारणता दीड तासानंतर आग आटोक्यात आली. याबाबत सासवड पोलीस स्टेशनला घटनेची नोंद केली आहे. दरम्यान सायंकाळी बँकेचे अध्यक्ष का. दी. मोरे यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली आणि विविध सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.