लघुपटात मराठी तरुणाची भरारी
By admin | Published: June 30, 2017 04:05 AM2017-06-30T04:05:50+5:302017-06-30T04:05:50+5:30
लघुपटाच्या रूपातील कलाकृती कायम दुर्लक्षित राहिल्या आहेत. प्रत्यक्षात, चित्रपटांच्या तुलनेत लघुपट अधिक सक्षम आणि ताकदीचे असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लघुपटाच्या रूपातील कलाकृती कायम दुर्लक्षित राहिल्या आहेत. प्रत्यक्षात, चित्रपटांच्या तुलनेत लघुपट अधिक सक्षम आणि ताकदीचे असतात. कमी वेळात प्रभावी संदेश देऊन प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची ताकद लघुपटांमध्ये आहे. पुण्यातील तरुणाचे अभिनयकौशल्य दर्शवणारा अशाच पद्धतीचा आशयघन लघुपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झळकला आहे. पीयूष देशमुख या मराठी तरुणाने ‘डॉक्टर एलिव्हेटर’ या अनेक पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय लघुपटामध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन कार्तिकेय गुप्ता यांनी केले आहे.
महोत्सवाच्या माध्यमातून लघुपटांना उत्तम व्यासपीठ मिळत असते, चित्रपटापेक्षा लघुपटांमधून रसिकांपर्यंत आशय कमी वेळेत पोहोचवता येतो. कमी वेळेत सर्जनशीलता आणि कल्पकता सिद्ध करणे हे लघुपटांमधील सर्वांत मोठे आव्हान असते, या बाबींचा विचार करत मूळचा पुण्याचा आणि सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या पीयूषने याच क्षेत्रात कारकीर्द करण्याचे ठरवले.
पुण्यातील अस्सल मराठी नाटकाची पार्श्वभूमी असणारा पीयूष विविध अभिनय प्रकारांत काम करण्यास उत्सुक होता. अभिनयात नानाविध प्रयोग करण्याची संधी त्याला अमेरिकेत मिळाली. त्याची भूमिका असलेल्या ‘डॉक्टर एलिव्हेटर’ या लघुपटाची आतापर्यंत ३५ चित्रपट महोत्सवांमध्ये निवड झाली आहे. या लघुपटाला मिळालेल्या मानांकनांपैकी पीयूषला अभिनयासाठीही मानांकने मिळाली आहेत.