हमीद दलवाईंवर लघुपट, अर्धशतकापूर्वीचा धर्मसंघर्ष आता पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 03:34 AM2019-03-19T03:34:52+5:302019-03-19T03:35:24+5:30
स्वत:च्या रूढिग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वधर्माबरोबर सुरू केलेला व त्यातून अन्य धर्मीयांबरोबरही झालेला संघर्ष आता लघुपटाच्या माध्यमातून पडद्यावर आला आहे.
पुणे: स्वत:च्या रूढिग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वधर्माबरोबर सुरू केलेला व त्यातून अन्य धर्मीयांबरोबरही झालेला संघर्ष आता लघुपटाच्या माध्यमातून पडद्यावर आला आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक असलेल्या हमीद दलवाई यांची जीवनगाथा यातून नव्या पिढीसमोर साकार होईल. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी यात दलवाई यांची भूमिका केली असून, चरित्र अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.
मंडळाच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी ५ वाजता एस. एम. जोशी सोशॅलिस्ट फाउंडेशन सभागृह, गांजवे चौक इथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हमीद : द अनसंग ह्युमॅनिस्ट’ असे या लघुपटाचे नाव आहे. हमीद यांच्या जीवनसंघर्षाचे चित्रीकरण, यात प्रसंग, मुलाखती यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्याचबरोबर आंततराष्ट्रीय ख्यातीच्या साहित्यिक डॉ. झीनत शौकत अली, दिल्लीची धनक फॉर ह्युमॅनिटी ही समतावादी संघटना व शाहीर बशीरभाई मोमीन कवठेकर यांचा या वेळी वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे.
विशेषांक
मंडळाचे मुखपत्र असलेल्या मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेच्या वर्धापन दिन विशेषाकांचे प्रकाशनही या वेळी होईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. लघुपटाचे सादरीकरण सायंकाळी ५ वाजता सुरू करण्यात येईल. त्यानंतर कार्यक्रम होईल असे संयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे.