थोडक्यात हुकलेली संधी अखेर गवसली
By admin | Published: June 2, 2017 02:30 AM2017-06-02T02:30:29+5:302017-06-02T02:30:29+5:30
यूपीएससी परीक्षेमध्ये गेल्या वर्षी मुलाखतीपर्यंत धडक मारली; मात्र अवघ्या काही गुणांनी आशिष पाटील यांची आयएएस अधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : यूपीएससी परीक्षेमध्ये गेल्या वर्षी मुलाखतीपर्यंत धडक मारली; मात्र अवघ्या काही गुणांनी आशिष पाटील यांची आयएएस अधिकारी बनण्याची संधी हुकली होती. त्यानंतर इंडियन बँकेच्या आॅफिसर पदासाठी निवड झाली; मात्र पुन्हा यूपीएससी परीक्षेची तयारी करायची की बँकेत नोकरी स्वीकारायची याबाबत द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. अखेर पुन्हा यूपीएससी परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला अन् गेल्या वर्षी अवघ्या काही गुणांनी हुकलेली संधी पाटील यांना गवसली.
यूपीएससी परीक्षेत आशिष पाटील याला ३३०वी रँक मिळाली आहे. आशिष मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील आहेत. त्यांच्या वडिलांचा वेल्डिंगचा वर्कशॉप आहे, तर आई गृहिणी आहे. बारावीनंतर आशिषने पुण्यातून इलेक्ट्रॉनिक अॅन्ड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केले. गेल्या ३ वर्षांपासून तो यूपीएससीची तयारी करीत होता.
यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात त्याला यश आले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात थेट मुलाखत दिली होती; मात्र अवघ्या काही गुणांनी त्याचे आयएएस व्हायचे स्वप्न भंगले होते. नाशिक येथील प्री-आयएएस सेंटरमध्ये त्याने एक वर्ष यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यानंतर पुण्याजवळील नऱ्हे गाव येथे रूम घेऊन पूर्णवेळ स्वयंअध्ययन करण्यावर भर दिला. अखेर २०१६-१७ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत त्याने यशाला गवसणी घातली.
यशामध्ये आईचा वाटा मोठा
आशिष यांच्या आईचे शिक्षण एम.ए.बी.एड.पर्यंत झाले आहे; मात्र त्यांनी नोकरी न करता पूर्णवेळ घराकडे लक्ष दिले. लहानपणापासून आशिषच्या अभ्यासाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. या यशामध्ये आईचा मोठा वाटा असल्याचे आशिषने सांगितले.