लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अल्प प्रतिसाद, दुस-या टप्प्याची सुरुवात कुर्मगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:12 AM2021-02-10T04:12:30+5:302021-02-10T04:12:30+5:30
पुणे : शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुस-या टप्प्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स आदींना लस ...
पुणे : शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुस-या टप्प्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स आदींना लस देण्यात आली. तर, सोमवारपासून ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणजेच शासकीय अधिकारी - कर्मचा-यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात अवघे २० टक्केच लसीकरण करण्यात यश आले असून दुस-या टप्प्याची सुरुवातही अतिशय संथगतीने झाल्याचे पहायला मिळाले.
शहरात सुरुवातीचे काही दिवस लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाला होता. पहिल्याच दिवशी अवघे ५५ टक्के असलेले प्रमाण दोन आठवड्यात दर दिवशी ८० टक्क्यांच्यावर पोचले होते. परंतु, पालिकेला ९५ हजार लसीकरणाचे लक्ष्य ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी अवघ्या १९ हजार ७५७ जणांनीच लस घेतली. पालिका, शासन, खासगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल कर्मचा-यांचा प्रतिसादच मिळाला नसल्याचे दिसत आहे.
पालिकेने सोमवारपासून दुस-या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. या टप्प्यात ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ला लस दिली जाणार आहे. यामध्ये पालिका-शासन-पीएमपीएमएल-शासकीय कार्यालये-चालक-कंत्राटी कर्मचारी-स्वच्छता कर्मचारी-सुरक्षारक्षक आदी शासकीय सेवकांना लस दिली जाणार आहे. दुस-या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी अवघ्या २० लोकांनीच लस घेतली. या टप्प्यात ६२ हजार लसीकरणाचे लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र वाढविणे, लोकांचे प्रबोधन करणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत.
====
अतिरिक्त आयुक्तांनी घेतली लस
लोकांच्या मनामधील भीती दूर व्हावी याकरिता पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी मंगळवारी लस घेतली. पूनावाला रुग्णालयामध्ये मंगळवारपासून फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणास अगरवाल यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. न घाबरता लस घ्यावी. ही लस अत्यंत सुरक्षित असून नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भीती या लसीकरणा बाबतची बाळगू नये असे आवाहन त्यांनी केले.
(फोटो : लक्ष्मण लॉगीनमध्ये व्हॅक्सीन नावाने)