जिल्ह्यात अँटिजेन किटचा तुटवडा; चाचण्या थांबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:10 AM2021-05-01T04:10:43+5:302021-05-01T04:10:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढले असले तरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढले असले तरी जिल्ह्यात अँटिजेन किट शिल्लक नसल्यामुळे या चाचण्या थांबल्या आहेत. आरोग्य विभागाने या किटची ऑर्डर दिली असली तरी अद्यापही या किटचा पुरवठा झालेला नाही. यामुळे तत्काळ निदान होत नसल्याने जिल्ह्यातील रुग्णांना कोरोना निदानासाठी आरटीपीसीआर चाचण्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.
पुणे, पिंपरीपाठोपाठ जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वेग वाढला आहे. एकेकाळी १०० च्या घरात सापडणारी कोरोनाबाधितांची संख्या आता ३ हजारांच्या घरात पोहोचली आहे. जिल्ह्यातून येणाऱ्या स्वॅबची तपासणी ससून रुग्णालयात होते. कोरोनाचे लवकर निदान व्हावे यासाठी अँटिजेन चाचणी केली जाते. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर आरटीपीसीआर चाचणी केली जाते. तर काहींना याच चाचणीच्या आधारे तातडीने उपचार दिले जातात. मात्र, जिल्ह्यातील अँटिजेन किटचा साठा संपत आल्याने या चाचण्या बंद झाल्या आहेत. यामुळे रूग्णांची तातडीने चाचणी होत नाही. सद्यस्थितीत १० हजारांच्या आसपास आरटीपीसीआर चाचण्या जिल्ह्यात होतात. या चाचण्यांना अँटिजेन चाचण्यांची मदत होत हाेती. मात्र, किट नसल्याने आता आरटीपीसीआर चाचण्यांचाच पर्याय जिल्ह्यातील नागरिकांपुढे आहे.
या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार म्हणाले, जवळपास १ लाख अँटिजेन किटची आॅर्डर दिली आहे. मात्र, अद्यापही या किट जिल्ह्याला मिळालेल्या नाहीत. यामुळे या चाचण्या थांबल्या आहेत. असे असले तरी आरटीपीसीआर चाचण्या या सुरू आहेत.