पुणे शहरात दोन दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा; वाहनांच्या रांगा, रिक्षाचालकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 08:57 AM2024-05-21T08:57:38+5:302024-05-21T08:58:11+5:30
पुणे शहराच्या सीएनजी गॅस पाइपलाइन देखभाल तांत्रिक दुरुस्तीसाठी दोन दिवसांपासून गॅस पुरवठा होत नसल्याने सीएनजी गॅससाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या...
पुणे : मागील काही वर्षांत पेट्रोल, डिझेलचे दर अधिक असल्याने सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांचा वापर वाढला आहे. पुणे शहराच्या सीएनजी गॅस पाइपलाइन देखभाल तांत्रिक दुरुस्तीसाठी दोन दिवसांपासून गॅस पुरवठा होत नसल्याने सीएनजी गॅससाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सध्या उन्हाळी सुट्या आहेत. यामुळे पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, पर्यटक आणि चाकरमानी आल्याने सीएनजी भरण्यासाठी गर्दी होत आहे. सीएनजी इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शहरात व उपनगरात सीएनजी पंप असल्याने चालकांची धावपळ उडत असल्याचे पाहायला मिळाले. याचा सर्वाधिक फटका हा प्रामुख्याने रिक्षा व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे चित्र शहरात दिसत होते.
मागील काही वर्षात पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने सीएनजी इंधनावर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. सीएनजी स्टेशनवर चारचाकी गाड्यांसाठी भली मोठी लाईन पाहायला मिळाली. सीएनजीसाठी लागलेल्या रांगा वाहतुकीस अडथळा ठरत आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर अधिक महाग झाल्याने सीएनजी गॅस वापरण्याची संख्या वाढली आहे. सामान्य रिक्षाचालकांना रोजच्या उदरनिर्वाहासाठी सीएनजी गॅस भरल्याने बचत होते. मात्र पेट्रोल शंभरी पार केल्याने रिक्षात परवडत नाही. त्यात दोन दिवसांपासून सीएनजी गॅस बंद आहे, याचा फटका सामान्यांना होत आहे.
- एकनाथ ढोले, सल्लागार, आम आदमी रिक्षा चालक व वाहतूकदार संघटना.
सीएनजी गॅस पाइपलाइन देखभाल तांत्रिक दुरुस्तीसाठी दोन दिवसांपासून गॅस पुरवठा होत नसल्याने सीएनजी गॅससाठी पेट्रोल पंपावर गर्दी दिसत होती. मात्र काही ठिकाणी सीएनजी गॅस पुरवठा सुरळीत हाेता. सोमवारी रात्री ११ पासून गॅस पुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.
- अली दारूवाला, अध्यक्ष, पेट्रोल असोसिएशन
सातारा रस्ता परिसरात दोन दिवसांपासून सीएनजी गॅस पुरवठा सुरू नसल्याने रिक्षा बंद ठेवावी लागली. त्यात सध्या वाढती महागाई आणि पेट्रोल शंभरी पार केली आहे. त्यामुळे पेट्रोलवर रिक्षा चालवणे परवडत नाही. सीएनजी ८६ रुपये आहे तर पेट्रोल १०४ रुपये आहे. त्यामुळे सामान्य रिक्षाचालकांना परवडत नाही. दोन दिवस पेट्रोल पंप सुरू होत आहे की नाही यासाठी हेलपाटे मारत आहे.
- महेश अष्टूळ, रिक्षा चालक