मार्केटमध्ये कांद्याचा तुटवडा, अपेक्षित नवीन आवक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 05:49 AM2017-11-17T05:49:34+5:302017-11-17T05:50:36+5:30
यंदा राज्यात बहुतेक सर्वच भागांत परतीच्या पावसाने पिकांचे प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे अद्यापही नवीन हळवी कांद्याची अपेक्षित अशी आवक सुरू झाली नाही.
पुणे : यंदा राज्यात बहुतेक सर्वच भागांत परतीच्या पावसाने पिकांचे प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे अद्यापही नवीन हळवी कांद्याची अपेक्षित अशी आवक सुरू झाली नाही. जुन्या कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे मार्केट यार्डात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी मागील दोन दिवसांत घाऊक बाजारात कांद्याच्या भावात प्रतिकिलो ५ रुपयांनी वाढ झाली आहे. जुन्या आणि नवीन कांद्यास घाऊक बाजारात अनुक्रमे प्रतिकिलोस २८ ते ३५ आणि २० ते ३० रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात जुन्या कांद्याची ४० ते ६० रुपये, नवीन कांद्याची ३० ते ४० रुपये भावाने विक्री होत आहे.
मार्केट यार्डातील कांदा विभागात मागील आठवड्यात दररोज १५० ट्रक कांद्याची आवक होत होती. त्यामध्ये केवळ १० ते १५ ट्रक नवीन हळवी कांद्याचा समावेश असायचा. ही आवक अपेक्षेपेक्षा कमी आहे. सध्या बाजारात पुणे जिल्हा आणि श्रीगोंदा परिसरातून नवीन कांद्याची आवक होत आहे. परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याने आणखी १५ ते २० दिवस ही आवक वाढण्याची शक्यता नाही. तर दुसरीकडे जुन्या कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.