एकीकडे लसींचा तुटवडा तर दुसरीकडे साठेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:36+5:302021-07-02T04:09:36+5:30
निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात एकीकडे लसीसाठी हजारो नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत थांबावे लागत आहे. लस न ...
निनाद देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात एकीकडे लसीसाठी हजारो नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत थांबावे लागत आहे. लस न मिळाल्याने अनेक नागरिक लस न घेतातच माघारी फिरत असल्याचे चित्र आहे. या सोबतच लस घेण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेन्टसाठीही झगडावे लागत असल्याची परिस्थीती आहे. शासनाकडून लसींचा अपुरा पुरवठा होत असल्याची सांगितले जात असल्याची परिस्थीती असतांना दुसरीकडे मात्र, जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांकडे ५ लाख ४० हजार लसींचे डोस शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या बाबत राज्यशासनाने जिल्ह्याला कळवले आहे. यामुळे हे शिल्लक डोस नागरिकांना लवकरात लवकर देऊन लसीकरणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन येडके यांनी या दवाखान्यांना केले आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीपासून जिल्ह्याला लसींचा कमी प्रमाणात पुरवठा झाला. यामुळे लसीकरण संथ गतीने सुरू आहे. सुरवातीला हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंन्ट लाईन वर्कर यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर जेष्ठ नागरिक आणि ४५ पेक्षा पुढील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले. मात्र, लसींचा पुरवठा लोकसंख्येच्या तुलनेत कमी होत असल्याने लसीकरणाचा वेग जिल्ह्यात संथगतीनेच सुरू आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत लस मिळत नसल्याने अजुनही अनेक नागरिक लस मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. जिल्ह्याला जास्तीत जास्त लस मिळण्याची मागणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. मात्र, राज्याने जिल्ह्यात खाजगी रुग्णालयात लस शिल्लक असल्याचे कळवले आहे. जवळपास ५ लाख ४० लाख डोस शिल्लक असल्याने जिल्ह्यात लसींची साठेबाजी होत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी खाजगी दवाखान्यांनी सहकार्य करून ही शिल्लक लस शासकीय दरानुसार नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन येडके यांनी केले आहे.
जिल्ह्यात पुणे शहरात ३०५, पिंपरी-चिंचवडमध्ये ११३ तर ग्रामीण भागात १६७ लसीकरण केंद्रे आहेत. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना दर महिन्याला लस पुरविली जाते. शासनाच्या परवानगीनुसार खाजगी दवाखान्यांना थेट विक्रेत्याकडून लस खरेदी करण्याचे अधिकार आहे. या अधिकाराखाली खाजगी दवाखान्यांनी लस खरेदी केली आहे. मात्र, नागरिकांना ती लस न देता या रुग्णालयाच्या माध्यमातून या लसींचा साठा केला जात आहे.
चौकट
अनेक केंद्रांना मिळेणा लस
जिल्ह्याला लसींचा कमी पुरवठा होत असल्याने समप्रमाणात या लसींचे वितरण आरोग्य विभागाला करावे लागत आहे. अनेक केंद्रांना लस मिळाली नसल्याने गेले दोन दिवस शहरात लसिकरण बंद ठेवावे लागते होते. एकीकडे लसिकरण केंद्र बंद तर खाजगी दवाखान्यात मात्र लस पडून असल्याचे चित्र आहे.
चौकट
राज्यात २३ लाख ८९ हजार डोस शिल्लक
जिल्ह्याप्रमाणे राज्यातही अनेक खासगी दवाखान्यांकडे लस शिल्लक आहे. ही संख्या जवळपास २३ लाख ८९ येवढी आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लवकरात लवकर या लसी नागरिकांना देणे गरजेचे आहे.
कोट
लसीकरणासंदर्भात राज्य आरोग्य विभागासोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांकडे ५ लाख ४० हजार डोस शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्याला एकीकडे कमी प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. यामुळे लसीकरण संथ गतीने होत आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी खाजगी दवाखान्यांनी लस न साठवता लस लवकरात लवकर नागरिकांना द्यावी.
डॉ. सचिन येडके, जिल्हा लसीकरण अधिकारी
चौकट
शासनाकडे चुकीची माहिती
शासनाच्या सूचनांप्रमाणे खासगी दवाखान्यांनी मुख्य विक्रेत्याकडून थेट पैसे भरून लस खरेदी केली आहे. यामुळे योग्य दरात त्या नागरिकांना देण्यात येत आहे. लसीसाठी आम्ही आगाऊ पैसे भरले असल्याने लसींचा साठा करण्याचा प्रश्नच येत नाही. शासनाकडे कदाचित चुकीची माहिती असेल.
- डॉ. शैलेश पुनतांबेकर, संचालक गॅलेक्सी केअर हॉस्पिटल
कोट
खासगी दवाखान्यात लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी आहे. यामुळे क्षमता असतानाही हवे तेवढे लसीकरण खासगी दवाखान्यात होत नाही. तर दुसरीकडे अनेक रुग्णालयांनी माेठ्या प्रमाणात लसी खरेदी केल्या. मात्र, त्यांची रोजची क्षमता जास्त नसल्याने लसीचा साठा शिल्लक असल्याचे दिसते. यामुळे शासनाने छोट्या दवाखान्यांनाही लसीकरणाची परवानगी द्यावी जेणेकरून लसीसाठा दिसणार नाही आणि लसीकरणाचा वेगही वाढेल.
डॉ. संजय पाटील, अध्यक्ष हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया पुणे शाखा