आधीच्या ग्रंथातील उणिवा दूर होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:10 AM2021-09-25T04:10:45+5:302021-09-25T04:10:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ज्ञान व्यवहारातही अनेक गफलती जाणीवपूर्वक केल्या जातात. डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या आधीच्या चरित्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ज्ञान व्यवहारातही अनेक गफलती जाणीवपूर्वक केल्या जातात. डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या आधीच्या चरित्र ग्रंथात यामुळेच राहिलेल्या उणिवा त्यांच्या या नव्या चरित्र ग्रंथाने दूर होतील, असा विश्वास इतिहास संशोधक डॉ. उमेश बगाडे यांनी व्यक्त केला.
सत्यशोधक समाजाच्या १४८ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिमा परदेशी लिखित डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन डॉ. बगाडे यांच्या हस्ते झाले. महात्मा फुले समता प्रतिष्ठान व सृजन प्रकाशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समता प्रतिष्ठानने या आधी अरुणा ढेरे यांच्याकडून लिहून घेतलेल्या चरित्र ग्रंथावर डॉ. बगाडे यांनी टीका करत परदेशी यांच्या चरित्र ग्रंथातील वेगळेपण उलगडून दाखवले.
सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विद्युत भागवत, प्रतिष्ठानचे पदाधिकारी दत्ता काळबेरे, समीक्षक प्रा. रणधीर श़िंदे, पी. टी. गायकवाड यावेळी उपस्थित होते.
डॉ. बगाडे म्हणाले, फुले यांचे समकालीन असलेले डॉ. घोले हे त्यांचे निकटचे सहकारीच नव्हे तर, सक्रिय समाजसुधारक होते. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी काम केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा विसर पडावा असा प्रयत्न तेव्हापासून ते आतापर्यंत होत होता. आधीचा ग्रंथ त्याचाच एक भाग होता. विशिष्ट दृष्टिकोनातून ते लेखन झाले. आज प्रकाशित झालेल्या नव्या ग्रंथाने ही उणीव दूर झाली आहे.
विद्युत भागवत यांनी लेखिका परदेशी यांनी सत्यशोधकी वृत्तीतून लेखन केले, अशी प्रशंसा केली. प्रा. शिंदे यांनी ग्रंथाचे मर्म सोदाहरण उलगडून सांगितले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांचे ध्वनीमुद्रित भाषण झाले.
कमलाताई पायगुडे यांच्या फुलेरचित अखंड गायनाने कार्यक्रम सुरू झाला. दत्ता काळबेरे यांनी प्रास्ताविक केले. शारदा वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.