दिग्गजांना फटका
By admin | Published: February 24, 2017 03:53 AM2017-02-24T03:53:51+5:302017-02-24T03:53:51+5:30
महापालिका निवडणुकीमध्ये आलेल्या कमळाच्या लाटेने राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमहापौर मुकारी अलगुडे, गटनेते व सभागृह
पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये आलेल्या कमळाच्या लाटेने राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमहापौर मुकारी अलगुडे, गटनेते व सभागृह नेते शंकर ऊर्फ बंडू केमसे, भाजपाचे गटनेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, मनसेचे गटनेते किशोर शिंदे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांच्यासह ४५ विद्यमान नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला आहे. त्याचबरोबर सलग २५ वर्षे सभागृहात असलेल्या कमल व्यवहारे, सुभाष जगताप
यांना सभागृहातून बाहेर पडावे लागले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागांमधील १६२ जागांसाठी ५५.५० टक्के मतदान झाले. शहरातील १४ निवडणूक कार्यालयनिहाय १४ ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस समसमान जागा मिळवतील, असा अंदाज व्यक्त केला जात असताना भाजपाने राष्ट्रवादीला मागे टाकून सर्वाधिक जागा मिळविल्या आहेत.
मुकारी अलगुडे, बंडू केमसे, गणेश बीडकर, अशोक हरणावळ, किशोर शिंदे, बाळासाहेब बोडके, सुभाष जगताप, कमल व्यवहारे, रूपाली पाटील-ठोंबरे, अभिजित कदम, युगंधरा चाकणकर, अश्विनी जाधव, पुष्पा कनोजिया, जयश्री मारणे, सुधीर जानजोत, कमल व्यवहारे, सुशीला नेटके, दत्ता बहिरट, हीना मोमीन, राजू पवार, अजय तायडे, सुनील गोगले, सचिन भगत, उषा कळमकर, भाग्यश्री दांगट, सुरेखा मकवान, शिवलाल भोसले, अस्मिता शिंदे, राहुल तुपेरे, संगीता गायकवाड, कैलास गायकवाड, विजय देशमुख, विजया कापरे, विजया वाडकर, बाबू वागस्कर, वनिता वागस्कर, सुरेखा कवडे, फारूक इनामदार, भरत चौधरी, सनी निम्हण, अर्चना कांबळे, रोहिणी चिमटे, नीता मंजाळकर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या भाजपाच्या गेलेल्या अनेक उमेदवारांनी विजय मिळविला आहे. रेश्मा भोसले, प्रकाश ढोरे, बापूराव कर्णे गुरुजी, सुनीता गलांडे या प्रमुख उमेदवारांसह अनेकांनी विजय संपादन केला.
पराभूत होण्याची महापौरांची परंपरा खंडित
महापालिकेच्या गेल्या काही निवडणुकांमध्ये विद्यमान महापौर पराभूत होण्याची मालिका सुरू झाली होती. राजलक्ष्मी भोसले, मोहनसिंग राजपाल यांना महापौर पदावर असताना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र प्रशांत जगताप यांनी महापौरांनी पराभूत होण्याची ही परंपरा खंडित केली आहे.
२५ वर्षांची अभेद्य मालिका खंडित
गेली २५ वर्षे सभागृह गाजविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभागृह नेते सुभाष जगताप, शहराच्या पहिल्या महापौर कमल व्यवहारे यांना अनपेक्षितरीत्या पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यांची सलग २५ वर्षांची मालिका खंडित झाली आहे.
या प्रमुख उमेदवारांनी मिळविला विजय
पालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या महापौर प्रशांत जगताप, भाजपा गटनेत्यांचा पराभव करणारे जायंट किलर रवी धंगेकर, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे भाजपा पुरस्कृत अपक्ष रेश्मा भोसले, भाजपाच्या माजी गटनेत्या मुक्ता टिळक, माजी उपमहापौर आबा बागुल, स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम, माजी स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी विजयश्री खेचून आणली आहे.
चार सदस्यीय प्रभाग
पध्दत ठरली हुकमी
महापालिकेची निवडणूक यंदा पहिल्यांदाच प्रभाग पध्दतीने पार पडली. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभुमीवर भाजपाने ४ सदस्यांचा एक प्रभाग करून महापालिकेसाठी मिनी विधानसभा मतदारसंघ पध्दतीने निवडणुका घेतल्या. या निवडणुका उमेदवारांच्या नावावर न होता पक्षांच्या नावावर व्हाव्यात यासाठी भाजपाने खेळलेली खेळी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.