‘आॅनलाईन’विरोधात तलाठ्यांची लेखणी 'शटडाऊन'
By admin | Published: September 6, 2015 03:25 AM2015-09-06T03:25:00+5:302015-09-06T03:25:00+5:30
संगणकीय सातबाऱ्यावरील त्रुटी दुरुस्त केल्या जात नसल्याने गेल्या ७ महिन्यांपासून नागरिकांची कामे रखडली आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून भोर व मुळशी तालुक्यातील
भोर : संगणकीय सातबाऱ्यावरील त्रुटी दुरुस्त केल्या जात नसल्याने गेल्या ७ महिन्यांपासून नागरिकांची कामे रखडली आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून भोर व मुळशी तालुक्यातील सर्व तलाठी सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील तलाठी, मंडल अधिकारी व अव्वल कारकून यांनी आजपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील महसूल विभागाची कामे ठप्प होतील.
सातबारा संगणकीकरणाचे सॉफ्टवेअर बनविणाऱ्या एन.आय.सी कंपनीला अनेक वेळा माहिती देऊनही कंपनीकडून सॉफ्टवेअरमध्ये बदल केले जात नाहीत. शिवाय कोणत्या अडचणी आल्या तर सोडविण्यास तंत्रज्ञ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे लोकांना लागणारा सातबारा मिळू शकत नाही; तर दोन महिन्यांपासून तहसील कार्यालयातील कक्षातून सातबारा देणे बंद केले आहे. तर १५ आॅगस्टपासून तलाठ्यांच्या संगणकावरील फार्टी क्लायंट यंत्रणाही बंद असल्याने कामे खोळंबली असल्याने नागरिकांचा तलाठ्यांवर रोष आहे़ यामुळे २८ आॅगस्टपासून भोर व मुळशी तालुक्यातील तलाठी संघटना सामूहिक रजेवर गेली आहे़ त्यांना जिल्हा तलाठी संघटनेने पाठिंबा दिला. सातबारा नोंदी हस्तलिखित करा, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे तलाठी संघाचे अध्यक्ष हेमंत नाईकवाडी यांनी सांगितले.