Manoj Jarange Patil:'मीच जास्त मार्क पाडायचे व फी पण मीच जास्त भरायची का? चिमुकल्याचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 12:14 PM2024-08-11T12:14:45+5:302024-08-11T12:18:27+5:30

पुण्यात मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीत चिमुकल्याने धरलेला बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

Should I pay more marks and pay more fees the boy held banner manoj jarange patil rally in pune | Manoj Jarange Patil:'मीच जास्त मार्क पाडायचे व फी पण मीच जास्त भरायची का? चिमुकल्याचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

छायाचित्र - कपिल पवार

पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांची महाराष्ट्रातून शांतता रॅली सुरु आहे. लाखो मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे. आज त्यांच्या रॅलीचा समारोप पुणे शहरात होणार आहे. पुण्यातही त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीये. सर्व ठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. तसेच ठिकठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. रॅलीचा सारसबागेपासून बाजीराव रोडने जंगली महाराज रस्त्यावरून डेक्कनला समारोप होणार आहे. 

सारसबागेत थोड्याच वेळात जरांगे पाटील दाखल होणार आहेत. पुण्यातून असंख्य मराठा बांधव सारसबागेत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच याठिकाणी चिमुकल्याने धरलेला बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. 'मीच जास्त मार्क पाडायचे व फी पण मीच जास्त भरायची का? का? का? हाच का न्याय?' अशा स्वरूपाचा मजकूर यावर लिहिण्यात आलेला आहे. चिमुकला भविष्याच्या दृष्टीने सरकारकडे अशी मागणी करत असल्याचे दिसून आले आहे. 

मराठ्यांना शिक्षण, नोकरीत आरक्षण मिळत नाही. त्यामुळे त्यांना बेरोजगार रहावे लागते. अनेक विद्यार्थी यामुळे टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. असे जरांगे पाटलांनी सांगितले होते. त्यामुळे सरकारने सरसकट मराठयांना आरक्षण दयावे अशी मागणी त्यांनी केली. परंतु सरकारने अजूनही त्यांची मागणी पूर्ण न केल्याने राज्यातून मनोज यांनी शांतता रॅलीला सुरुवात केली आहे. अशातच या चिमुकल्याने धरलेला बॅनर हायलाईट होऊ लागला आहे. सरकार आजच्या रॅलीनंतर आरक्षणाबाबत काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.    

शनिवारी (दि.१०) सोलापूर आणि सांगली येथे रॅली झाली. त्यानंतर आज (दि.११) ही फेरी पुण्यात दाखल होत आहे. त्या निमित्ताने स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. सारसबागेच्या चौकातही मोठमोठे फलक लावले असून, भगवे झेंडे पहायला मिळत आहेत. तसेच डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याभोवती फुलांची सजावट करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक मराठा बांधव हळूहळू सारसबागेसमोर जमा होत आहेत.     

Web Title: Should I pay more marks and pay more fees the boy held banner manoj jarange patil rally in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.