तब्येत बिघडल्यास ब्यूटीपार्लरमध्ये नेणार की रूग्णालयात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:07 AM2021-05-03T04:07:08+5:302021-05-03T04:07:08+5:30
पुणे : ‘माझ्या आईचे वय झाले आहे, तर तिला आपण कुठे घेणार जाणार ? ब्यूटीपार्लर की रूग्णालयात ? ?’ ...
पुणे : ‘माझ्या आईचे वय झाले आहे, तर तिला आपण कुठे घेणार जाणार ? ब्यूटीपार्लर की रूग्णालयात ? ?’ या प्रश्नावर उत्तर आले अर्थातच रूग्णालयात ! मग मुठा नदीच्या सौंदर्यकीकरणासाठी कशाला हजारो कोटींचा खर्च केला जात आहे ? असा सवाल ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सारंग यादवडकर यांनी महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांना विचारला. त्यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. यावरूनच नदी सुधार योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सजग नागरिक मंच मासिक सभेतंर्गत रविवारी ‘महापालिकेच्या नदी सुधार’ योजनेवर ऑनलाइन कार्यक्रम आयोजिला होता. त्यामध्ये पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमारच केला.
या वेळी मंचाचे विवेक वेलणकर, जुगल राठी, सारंग यादवडकर, जीवितनदीच्या शैलजा देशपांडे, मनीष घोरपडे, गुरूदास नूलकर आदी नदी अभ्यासक सहभागी झाले होते.
दिघे यांनी नदी पात्रालगतचा कचरा काढून सर्वत्र सुशोभीकरण करण्यात येणार असून, त्यात जीवंत झऱ्याचा विचार केल्याचे सांगितले. नदी पात्रात सांडपाणी येत असून, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’ प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. ते नदीपात्रालगतच असतील. तसेच नदीकाठी जे स्थानिक वृक्ष आहेत, त्यांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे पक्ष्यांनाही अन्न मिळू शकेल, असे दिघे यांनी सांगितले.
————————-
पुणेकरांचा पैसा खर्च होणार
नदी सुधार प्रकल्पाचे एकूण बजेट २६१९ कोटी रूपये आहे. हा निधी स्वयंसेवी संस्था आणि महापालिका बजेटमधून उभा करणार आहे. याचाच अर्थ पुणेकरांचा पैसा यात खर्ची होणार आहे, असा सवाल वेलणकर यांनी उपस्थित केला.
————————-
अंडी कुठे उबवणार ते तज्ज्ञ पाहतील ?
नदीकाठी पाणथळ जागा असते, तिथे अनेक पक्षी आपले अंडी उबवतात. नदीकाठचे सिमेंटीकरण केल्यावर पाणथळ जागा नष्ट होईल. त्यामुळे पक्षी अंडी कुठे उबवणार ? असा सवाल एका नागरिकाने उपस्थित केला. त्यावर दिघे म्हणाले,‘‘ पक्षी अंडी कुठे उबवणार, ते तज्ज्ञ पाहून घेतील.’’
——————————
पूराचा पुणेकरांना फटका बसणार
सारंग यादवडकर यांनी ‘टेरी’ संस्थेने पुण्यातील पावसाबाबतच्या एका रिपोर्टवर लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले, शासनासाठी ‘टेरी’ संस्थेने पुण्यातील भविष्यातील पावसाचा अंदाज दिला आहे. त्यात सुमारे ३७.५ टक्के पाऊस अधिक होणार असल्याचे नमूद केले आहे. या अहवालाचा विचार केला आहे का ? असे दिघे यांना विचारले असता ते नाही बोलले. याचाच अर्थ नदीकाठ बांधल्यानंतर पूर आला तर त्याचा फटका पुणेकरांना बसू शकतो.
————