इतिहासातून शिकायला हवे - राजेंद्र भामरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 03:00 AM2018-08-26T03:00:41+5:302018-08-26T03:00:58+5:30
राजेंद्र भामरे : रंगावली आणि दिव्यातून बाजीराव पेशवे यांना मानवंदना
पुणे : थोरले बाजीराव पेशव्यांनी केवळ २० वर्षांच्या कारकिर्दीत असामान्य कर्तृत्व गाजवले. मेहनत आणि चिकाटीनेच यशाची उंची गाठता येईल. इतिहासाचा अभ्यास करताना त्याच्यापासून योग्य बोध घ्यायला हवा. इतिहासामध्ये झालेल्या चुका लक्षात घेऊन त्या भविष्यात कशा टाळता येतील, याचा अभ्यास करायला हवा. भविष्याचा पाया भक्कम करण्यासाठी इतिहासातून शिकायला हवे, असे मत माजी पोलीस अधिकारी राजेंद्र भामरे यांनी व्यक्त केले.
निनाद, पुणे आणि निनाद नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे बाजीराव पेशवे यांच्या ३१८ व्या जयंतीनिमित्त सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृह येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रंगावली आणि ३१८ दिव्यातून बाजीराव पेशवे यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. पुणे विद्यार्थी गृहाचे उपकार्याध्यक्ष हणमंत भोसले, मुख्याध्यापक टी. आर. गोराने, निनाद पुणेचे उदय जोशी, उद्योजक अनिल गानू, रंजन पिंगळे, पुरुषोत्तम वाईकर, सतीश गांधी, अश्विनी गानू, सचिन देसाई, शेखर कोळेकर, विक्रम काळे आदी या वेळी उपस्थित होते. रंगावलीकार सुनील सोनटक्के आणि वैशाली सोनटक्के यांनी रंगावली रेखाटली. बाजीराव पेशवे यांच्या वरील निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. ईशा चव्हाण हिने प्रथम, आदित्य तायडे याने द्वितीय, युवराज मोहिते याने तृतीय, तर सानिका खांडेकर हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे निष्णात योद्धे होते. शिवाजीमहाराजांच्या तोडीचे कर्तृत्व त्यांनी गाजविले आणि मराठी साम्राज्याचा अटकेपार झेंडा त्यांनी फडकाविला. जगातील ज्या थोर लोकांनी असामान्य कर्तृत्व गाजविले ते कर्तृत्व त्यांनी स्वत:च्या देशासाठी आणि समाजासाठी केले.
- हणमंत भोसले