ST मध्ये प्रवास झाला मोफत; पानसुपारी आणायची? आजोबा चालले तालुक्याला!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 01:53 PM2022-09-03T13:53:59+5:302022-09-03T13:56:30+5:30
आठवडाभरात तीन हजारपेक्षा अधिक ज्येष्ठांनी घेतला लाभ...
पुणे : नुकत्याच पार पडलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना एसटीत मोफत प्रवास करता येणार अशी घोषणा केली. याच्या अंमलबजावणीला एसटी महामंडळातर्फे सुरुवातदेखील झाली. यामुळे ७५ वर्षांवरील ज्येष्ठांची बसमधील संख्या वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहे. देवदर्शनासाठी, लेकीकडे, नातेवाइकाकडे जाणाऱ्या ज्येष्ठांची संख्या यात सर्वाधिक असल्याची माहिती समोर येत आहे.
आठवडाभरात तीन हजारपेक्षा अधिक ज्येष्ठांनी घेतला लाभ
या योजनेची घोषणा होताच ज्येष्ठांनी एसटी स्थानकांवर जाऊन विचारणा करण्यास सुरुवात केली होती. घोषणेच्या काही दिवसांनंतर एसटी महामंडळाकडून योजना प्रत्यक्षात राबविण्यास सुरुवात केली. पुणे विभागात एका आठवड्यात तीन हजारपेक्षा अधिक ज्येष्ठांनी या योजनेचा लाभ घेतला असून, दिवसेंदिवस ही संख्या वाढत असल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली.
‘लोकमत’ने काय पाहिले?
‘लोकमत’ने स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्थानकांवर जाऊन पाहणी केली असता प्रत्येक बसमध्ये ३ ते ५ टक्क्यांदरम्यान ७५ वर्ष अथवा त्यापुढील ज्येष्ठ प्रवासासाठी निघालेले दिसून आले. काही देवदर्शनासाठी चालले होते, काही त्यांच्या लेकीकडे तर काही ज्येष्ठ खरच बस प्रवास मोफत आहे का याची पाहणी करण्यासाठी जवळच असलेल्या गावी जाऊन पुन्हा येण्याच्या तयारीत होते. काहींनी तर करमत नव्हते म्हणून जवळच गाव असलेल्या नातेवाइकाकडे जात असल्याचे सांगितले. दोन ज्येष्ठ मित्र दौंडहून पुण्यात त्यांना दररोज लागणारी सुपारी आणण्यासाठी पुण्यात आले होते, ती घेऊन पुन्हा बसने जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य सुविधा फुकटात केली असती तर...
आम्हाला एसटीचा प्रवास मोफत झाला ही आनंदाची बाब नक्कीच आहे. पण आम्हाला या वयात फिरण्यापेक्षा मोफत आरोग्य सुविधा सरकारने देण्याची घोषणा केली असती तर खूप आनंद झाला असता.
- वासुदेव साठे
मी ही योजना सुरू झाल्यापासून दोनवेळा माझ्या मुलीकडे मुंबईला जाऊन आलो. पण आम्हाला वयोमानानुसार बीपी, शुगरच्या व्याधी जडल्या आहेत. माझ्यासारख्या अनेक ज्येष्ठांना यासाठी लागणाऱ्या औषध-गोळ्या दर महिन्याला घेणे परवडणारे नाही. त्यामुळे आम्हाला वैद्यकीय सुविधा मोफत दिल्या तर अधिक फायद्याचे ठरेल. राज्य सरकारला माझ्या वतीने मी विनंती करतो.
- विनायक कुलकर्णी