गावाला वाकडेवाडीहून जायचे का? शिवाजीनगर ST स्टँडच्या कायमस्वरूपी स्थलांतरास पुणेकरांचा तीव्र विरोध
By राजू इनामदार | Published: October 11, 2022 07:01 PM2022-10-11T19:01:03+5:302022-10-11T19:01:21+5:30
एसटी स्थानक बांधण्यास महामंडळाकडून विलंब होत असल्याने हे जुने स्थानक इतिहासजमा होण्याची चिन्हे
पुणे : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले, प्रवाशांना सोयीचे ठरणारे शिवाजीनगर एसटी स्थानक कायमस्वरूपी वाकडेवाडीला ठेवण्यास पुणेकरांचा तीव्र विरोध आहे. महामेट्रोच्या या जागेवरचे भुयारी स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर वरील जागेवर पूर्वीप्रमाणेच एसटी स्थानक बांधण्यास महामंडळाकडून विलंब होत असल्याने हे जुने स्थानक इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, आता तर वाकडेवाडी स्थानकाच्या जागेसंदर्भातही या जागेचा करार संपल्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महामंडळ वापरत असलेल्या या जागेचे भाडे महामेट्रो जमा करत आहे. करारात तसेच नमूद करण्यात आले होते. महामंडळ व महामेट्रो यांच्यातील हा सामंजस्य करार १० सप्टेंबरला संपला. तत्पूर्वीच महामेट्रोने वाकडेवाडीच्या जागेचा करार संपल्याचे पत्र महामंडळाला दिले. ही जागा सरकारच्याच एका विभागाची आहे; मात्र तरीही या जागेचे भाडे महामेट्रोला द्यावे लागत आहे. आता करार संपल्यावर भाडे कोणी जमा करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाला करार संपला असे कळवले आहे. याचा निर्णय मंत्रिस्तरावर राज्य सरकारच्या माध्यमातून होईल. सरकारने वाकडेवाडीची जागा महामंडळाला सध्याचे स्थानक तिथेच कायमस्वरूपी करण्यासाठी द्यावी अशी मागणी महामंडळाकडून केली जात आहे. महामेट्रोने करार संपल्याचे सांगितल्यानंतर एसटी महामंडळाला त्या जागेचे भाडे संबंधित खात्याकडे जमा करणे शक्य नाही. त्यामुळे ही जागा विनामोबदला द्यावी अशी मागणी करण्याचा विचार महामंडळ स्तरावर सुरू असल्याची माहिती मिळाली.
शिवाजीनगर स्थानकाची जागा महामंडळाच्या मालकीची आहे. त्याच जागेखाली महामेट्रोचे शिवाजीनगर भुयारी स्थानक आहे. त्याच्या कामासाठी म्हणून महामेट्रोने ही जागा घेतली होती. त्यावेळी एसटी महामंडळ व महामेट्रो यांच्यात करार झाला होता. त्यानुसार भुयारी मार्गाचे काम होईपर्यंत स्थानक वाकडेवाडीला स्थलांतरित केले जाईल. भुयारी मार्गाचे काम झाल्यानंतर वरील जागेवर पूर्वीप्रमाणेच शिवाजीनगर एसटी स्थानक नव्याने बांधण्यात येईल. ते काम महामेट्रो करून देईल.
दरम्यानच्या काळात महामंडळाकडून या जागेवर व्यापारी संकुल बांधण्याचा विचार सुरू झाला. त्यामुळे जुन्या जागेवर एसटी स्थानक बांधण्याबाबत काहीच हालचाल होत नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठी बसस्थानके नकोत असे धोरण राज्य सरकारने घेतले. त्यानुसार आता एसटी स्थानक वाकडेवाडीतच ठेवण्याचा विचार वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याची माहिती मिळाली.
''वास्तविक करारानुसार आता महामेट्रोने महामंडळाला जुन्या जागेवर पूर्वी होते तसे एसटी स्थानक बांधून द्यावे. त्याच्यावर व्यापारी संकुल बांधायचे की आणखी काही याचा निर्णय महामंडळ व राज्य सरकार घेईल. स्थानकाची जागा महामंडळाची आहे. याबाबत बोलणी सुरू आहेत. - विद्या भिलारकर, डेप्युटी जनरल मॅनेजर, (सिव्हिल). एस.टी महामंडळ''
''मुंबईहून कोणी वाकडेवाडीला आले व त्यांना तिथे उतरून कोथरुडला जायचे असेल तर या दोन्ही प्रवास तिकीट भाडे सारखेच असून पुण्यातील रिक्षा महाग आहे. स्थानक आहे तिथेच ठेवावे. वाकडेवाडीला हवे तर दुसरे स्थानक करावे. नफ्यासाठी प्रवाशांना वेठीस धरू नये - विलास लेले, अध्यक्ष ग्राहक पंचायत पुणे विभाग''
''पूर्वी होते तिथेच स्थानक बांधावे. परगावी जायचे असेल तर वाकडेवाडीला एसटीसाठी जाणे हेच एका गावाला गेल्यासारखे होते. त्याशिवाय तिथून पुणे शहरात येणेही त्रासदायक आहे. त्यामुळे या निर्णयाला आमचा विरोध आहे. - प्रा. सतीश मेहता, सदस्य, पीएमपीएल प्रवासी संंघ''