सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस विद्यार्थी दाखवा, लाखो कमवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 11:25 AM2019-05-14T11:25:48+5:302019-05-14T11:27:54+5:30
‘कमवा व शिका’ ही योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज ३ ते ४ तास कामांचे उपलब्ध करून दिले जाते. त्यापोटी त्यांना प्रति तास ४५ रूपये मानधन दिले जाते.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘कमवा व शिका’ योजनेतील लाखो रूपयांच्या निधीचा गेल्या ५ वर्षांपासून अपहार झाला आहे. ‘कमवा व शिका’ योजनेत कार्यरत असलेले कर्मचारी, विद्यार्थी आणि बाहेरील काही व्यक्तींनी संगनमताने निधी लाटल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.
‘पुणे विद्यापीठा’त अनेक वर्षांपासून ‘कमवा व शिका’ ही योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज ३ ते ४ तास कामांचे उपलब्ध करून दिले जाते. त्यापोटी त्यांना प्रति तास ४५ रूपये मानधन दिले जाते. त्याचे महिना साडेतीन ते चार हजार रूपये विद्यार्थ्यांना मिळतात. यातून विद्यार्थी त्यांचा खर्च भागवात. सध्या विद्यापीठातील रेकॉर्डनुसार दीड हजार विद्यार्थी या योजनेत कार्यरत असून त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये दरमहा वेतन जमा होते. मात्र प्रत्यक्षात यातील काही अकाऊंट बोगस विद्यार्थ्यांच्या नावाने तयार केल्याचे उजेडात आले आहेत. विद्यापीठाचे विद्यार्थी नसताना तसेच ‘कमवा व शिका’मध्ये कार्यरत नसताना काही व्यक्तींच्या नावे गेली दोन-तीन वर्षे वेतन जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
बोगस वेतन लाटणाऱ्या ‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थ्याचे नाव व बँक अकाऊंटधारकाचे नाव वेगवेगळे आहे. त्याचबरोबर कामावर हजर नसतानाही कमिशन घेऊन पगार काढले गेल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
या गैरप्रकाराबद्दल विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रभाकर देसाई यांना २२ फेब्रुवारी २०१९ रोजी लेखी निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांनी स्वत: या प्रकरणाचे पुरावे गोळा करून संचालकांकडे दिले. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर याप्रकरणाची पडताळणी केली असता यात तथ्य आढळून आले असून याप्रकरणी माजी कुलगुरू डॉ. अरूण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. याप्रकरणाची येत्या ३ आठवडयात समितीकडून अहवाल सादर केला जाणार आहे.
......
दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल
कमवा व शिका योजनेत आर्थिक अनियमितता आढळून आल्याने लगेचत माजी कुलगुरू डॉ. अरूण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. सखोल चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल.
-डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
................
योजनेला धक्का लावू नये
‘कमवा व शिका’ योजनेतील गरिब विद्यार्थ्यांच्या निधीवर डल्ला मारण्याचा गंभीर गुन्हा काहींनी केला आहे. परिणामी ही योजना उन्हाळी सुट्टीत बंद करणे, विद्यार्थी संख्या कमी करणे असे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत योजनेला धक्का लावला गेला तर आंदोलन केले जाईल.
-श्रीकांत मिश्रा, पीएच.डी. विद्यार्थी, हिंदी विभाग
..................
राज्यपाल कार्यालयाने घेतली दखल
विद्यापीठात झालेल्या गैरव्यवहाराची दखल राज्यपाल कार्यालयाने घेतली आहे. विद्यार्थी गणेश खोसे व अमोल घोलप यांनी याप्रकरणी राज्यपाल कार्यालयास पत्र दिले होते. त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आल्याचे राज्यपालांचे अवर सचिव प्र. पां. लुबाळ यांनी कळविले आहे.
..................
निवड प्रक्रियेत अपारदर्शकता?
विद्यार्थी कल्याण मंडळात ‘कमवा व शिका’साठी नुकत्याच घेतलेल्या समन्वयकांची निवड पारदर्शकतेने झालेली नाही. एक समन्वयक गेल्या १० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना दर अकरा महिन्यांनी व्यवस्थापन परिषदेकडून मुदतवाढ दिली जाते. वस्तूत: जाहिरात, मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया पार पाडली जाणे आवश्यक आहे. मात्र निवड प्रक्रियेत पारदर्शकता न ठेवल्याने गैरप्रकारांना वाव मिळत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
........