करंजेच्या ग्रामसेवक, सरपंचास कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:49+5:302021-06-30T04:07:49+5:30

अनियमितता, बोगस बिले, हिशोबपत्रके, अतिक्रमणांची चौकशी पूर्ण अनियमितता, बोगस बिले, हिशोबपत्रके, अतिक्रमणांची चौकशी पूर्ण सोमेश्वरनगर : करंजे येथील ग्रामपंचायतीत ...

Show cause notice to Karanje Gramsevak, Sarpanch | करंजेच्या ग्रामसेवक, सरपंचास कारणे दाखवा नोटीस

करंजेच्या ग्रामसेवक, सरपंचास कारणे दाखवा नोटीस

Next

अनियमितता, बोगस बिले, हिशोबपत्रके, अतिक्रमणांची चौकशी पूर्ण

अनियमितता, बोगस बिले, हिशोबपत्रके, अतिक्रमणांची चौकशी पूर्ण

सोमेश्वरनगर : करंजे येथील ग्रामपंचायतीत झालेल्या अनियमिततेबाबत, हिशोबपत्रके, बोगस बिले, आणि अतिक्रमणाची चौकशी पूर्ण झाली असून, चौकशी अधिकारी दत्तात्रय खंडागळे यांनी बारामतीचे गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर केला आहे. यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर ताशेरे ओढत अनियमितता झाल्याचा तर, काही ठिकाणी रक्कम वसूलपात्र असल्याचा अहवाल सादर केला आहे. याबाबत बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटिसा काढून खुलासा मागविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

याबाबत येथील राकेश बबन गायकवाड यांनी पंचायत समितीकडे तक्रार अर्ज करत ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. दिवाबत्तीच्या नावाखाली वेळोवेळी फक्त साहित्याची बिले आणून प्रत्यक्ष कामकाज केले नाही. एलईडी बल्ब खरेदी करताना शासनाने ठरवून दिलेल्या तरतुदीनुसार मासिक सभेत ठराव न घेता दरपत्रक सादर केले नाही. त्यामुळे बाजारमूल्य आधारित रकमेचा फायदा झाला किंवा कसे, याबाबत मेळ घेता आला नसल्याने सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आर्थिक अनियमितता केल्याचा ठपका ठेवला आहे. अंगणवाडी केंद्राचा अहवाल सादर करणार असल्याचे ग्रामसेवक यांनी सांगितले असले तरीही येथील कामाचे मूल्यांकन केले नाही. त्यामुळे येथे केलेला खर्च मान्य नसून १ लाख २६ हजार ही रक्कम आक्षेपाहीन ठेवण्यात आली असून, सदर रक्कम वसूलपात्र ठेवण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करताना जाहिरात देण्यात आली नव्हती. याशिवाय ५ च कॅमेरे बसविले असताना १२ कॅमेरे बसविल्याचे दाखविण्यात आले आहेत. याशिवाय दरपत्रके यांची मागणी केली नसल्याचे बाजार मूल्याचा फायद्यापासून ग्रामपंचायतीस वंचित ठेवून आर्थिक तोटा केला असून, यास सरपंच, ग्रामसेवक जबाबदार असून या आर्थिक व्यवहारात कायद्यातील तरतुदींचा भंग झाल्याचे स्पष्ट केले आहे.

सरपंच, ग्रामसेवकाकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश...

कोरोना काळात आशा वर्करसाठी ५६ हजार रुपयांचे किट खरेदी केले असून ते नियमित आहे. वाढदिवसाच्या जाहिरातींवर नियमबाह्य खर्च केला असून यासाठी खर्च केलेले १५ हजार रुपये रक्कम वसूलपात्र असून, ती सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून समप्रमाणात वसूल करण्याचा आदेश दिला आहे. शेतकरी सहलीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडीचे भाडे दिले असून हा खर्च निवडणुकीचा आहे, असे म्हणता येणार नाही. मुरमीकरणासाठी केलेला खर्च अंदाजपत्रकानुसार केला आहे. तसेच सरपंच यांच्याकडे काम करणारा कर्मचारी इतरत्र काम करू शकत नाही, असे म्हणता येणार नसल्याने त्याचे बिल देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर बोगस बिले काढले असे म्हणता येणार नाही. बाबूराव धनू गायकवाड यांच्या नावे असलेली गावठाणमधील अतिक्रमणातील जमीन नोंद ही वारसा हक्काने पुढे गुलाब बाबूराव गायकवाड यांच्या नावे झाली असून, ही नियमानुसार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

निधीचा बेकायदेशीर वापर...

वृक्षलागवडीसाठी ६३ हजार रुपये खर्च करण्यात आली असून या कामाचे मूल्यांकन झाले नाही. त्यामुळे हा बोगस केलेला खर्च आक्षेपाधीन ठेवण्यात आला असून, या खर्चास सरपंच व ग्रामसेवक यांना दोषी ठरविण्यात आले आहे. १४ व्या वित्त आयोगातील बाके खरेदीतही अफरातफर झाली असून यातही सरपंच व ग्रामसेवक दोषी ठरले आहेत. शासनाच्या नियमानुसार मंदिर किंवा धार्मिक स्थळे बांधण्यास मनाई असताना अभ्यासिकेत देवीची मूर्ती बसवून निधीचा बेकायदेशीर वापर केला असल्याचे ताशेरे अहवालात ओढले आहेत.

-------------------------------

Web Title: Show cause notice to Karanje Gramsevak, Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.