... शो मस्ट गो ऑन !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:53 AM2019-11-21T11:53:57+5:302019-11-21T11:57:34+5:30
वय वर्षे ४२... कर्करोगाशी सुरू असलेली कडवी झुंज... त्याचवेळी रंगमंचावर बहरत असलेली कारकीर्द...
प्रज्ञा केळकर-सिंग-
पुणे : ‘बाबु मोशाय, हम सब तो रंगमंच की कठपुतलिया है’ असं म्हणत राजेश खन्ना आयुष्याचं गणित किती सहजतेने उलगडून सांगतात! आयुष्याचा रंगमंच असो की नाटकाचा... प्रत्येकाने आपली भूमिका खुबीने वठवलीच पाहिजे, असं सांगणारा ४२ वर्षांचा ‘लढवय्या’, हरहुन्नरी संतोष ढेबे हा कलाकारही तितकाच भावतो. वय वर्षे ४२... कर्करोगाशी सुरू असलेली कडवी झुंज... त्याचवेळी रंगमंचावर बहरत असलेली कारकीर्द... एखाद्या चित्रपटात शोभणारे हे दृश्य! मात्र, प्रत्यक्षात असा अवलिया रंगमंचावर अवतरतो तेव्हा ‘रडायचं नाही... लढायचं’ याची शब्दश: प्रचिती येते.
संतोष ढेबे यांनी आपल्या सकारात्मकतेतून, कलेप्रती असलेल्या प्रेमातून असाच आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये आज (गुरुवार) भरत नाट्य मंदिर येथे ढेबे यांची भूमिका असलेले ‘आवर्त’ हे नाटक सादर होत आहे. दुसºया टप्प्यावर त्यांना कर्करोगाचे निदान झाले आणि ताबडतोब शस्त्रक्रियाही करावी लागली. सध्या केमोथेरपीचे उपचार सुरू आहेत.
केमोथेरपीच्या आठ सायकलपैकी तीन सायकल पूर्ण झाल्या आहेत. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर उपचार सुरू असतानाही त्यांनी रंगभूमीविषयी जपलेली आपुलकी सकारात्मकतेची साक्ष देणारी ठरत आहे. संतोष ढेबे यांच्या या जिंदादिलीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
सरकारी कर्मचारी असलेले ढेबे पहिल्यापासूनच नाटकात, वाचनात रमतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून ते एकांकिका तसेच नाटकांमध्ये हौशी कलाकार म्हणून कार्यरत आहेत. सर्व काही सुरळीत चाललेले असताना सप्टेंबर महिन्यात अचानक तब्येतीचा त्रास सुुरू झाला म्हणून पत्नीसह ते डॉक्टरकडे गेले.
सर्व तपासण्या झाल्यावर ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. आयुष्यच उद्ध्वस्त झाले, या भावनेने त्यांच्या मनात घर केले. आई, पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा परिवार. आजाराचे संकट कोसळल्याने सर्वजणच खचले.
‘सगळं संपलं’ असे वाटत असतानाच कलेने आशेचा किरण दाखवला. शस्त्रक्रिया झाल्यावर काही दिवसांमध्येच आशुतोष नेर्लेकर यांचा फोन आला आणि त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत काम करण्याविषयी विचारणा केली. त्यांना आजाराबाबत काहीच कल्पना नव्हती. ढेबे सर्व काही मोकळेपणाने बोलले आणि लगेच होकार दिला.
.........
अनेक नाटकांत संतोष ढेबे यांनी केली भूमिका
४संतोष ढेबे यांनी यापूर्वी ‘नटसम्राट’ या नाटकामध्ये विठोबा आणि कळवणकर या भूमिका साकारल्या आहेत. ‘योगीराज’ या नाटकामध्ये स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे.
४महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये राजमुद्रा संशोधन आणि विकास केंद्राच्या ‘आवर्त’ या नाटकामध्ये ते पोलीस अधिकाºयाची भूमिका बजावत आहेत. नाटकाचे लेखन अनिरुद्ध रांजेकर यांनी केले असून, दिग्दर्शन आशुतोष नेर्लेकर यांचे आहे.
...........
४‘लोकमत’शी बोलताना ढेबे म्हणाले, नैराश्याने ग्रासले ते केवळ पहिल्या दिवशीच. दुसराच दिवस कमालीची सकारात्मकता घेऊन आला. कलाच आपल्याला जगवेल, आयुष्याकडे आशावादी दृष्टीने पाहायला शिकवेल याची खात्री पटली.
४रंगभूमीशी नाते तोडायचे नाही, किंबहुना अधिक घट्ट करायचे, ही कल्पना पत्नीला बोलून दाखवली. तिने तत्काळ होकार दिला आणि पाठिंबाही.
४नाटकाचा सराव सुरू झाल्यापासून पत्नी स्वत: मला घ्यायला आणि सोडायला येते. माझे पथ्यपाणी, औषधे आदींची काळजी घेते. नाटकाने मला नव्या उमेदीने उभे राहण्याचे बळ दिले.