आगारप्रमुखांना कारणे दाखवा
By admin | Published: December 22, 2016 02:41 AM2016-12-22T02:41:09+5:302016-12-22T02:41:09+5:30
अपेक्षित कामगिरी न झाल्याच्या कारणास्तव पुणे महागनर परिवहन महामंडळाने (पीएमपी) तीन आगारप्रमुखांना ‘कारणे दाखवा
पुणे : अपेक्षित कामगिरी न झाल्याच्या कारणास्तव पुणे महागनर परिवहन महामंडळाने (पीएमपी) तीन आगारप्रमुखांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्याद्वारे त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला असून, समाधानकारक कारणे नसल्यास निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.
पीएमपीची स्थिती सुधारण्यासाठी पालिका आयुक्त व पीएमपीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक कुणाल कुमार यांनी सर्व आगारप्रमुखांना टार्गेट ठरवून दिले आहे. त्यामध्ये प्रवासीसंख्या वाढविण्याबरोबरच मार्गावरील बसची संख्या, ब्रेकडाऊनचे प्रमाण, कर्मचाऱ्यांची उपस्थिती अशा विविध ११ मुद्द्यांचा समावेश आहे. त्यानुसार मागील महिन्यापासून प्रत्येक आगार स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर, कुणाल कुमार यांनी मागील शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व १३ आगारप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत दिलेल्या टार्गेटनुसार आढावा घेण्यात आला. यामध्ये तेरापैकी सहा आगारांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे आढळून आले. त्यांपैकी स्वारगेट, कात्रज आणि हडपसर ही तीन आगारे सर्वांत खाली होती.
या आगारांच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश कुमार यांनी दिला. त्यानुसार तिन्ही प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात
आली असून, समाधानकारक खुलासा नसल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पीएमपीतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)