चौकात भेटा दाखवतोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 04:27 AM2017-07-21T04:27:17+5:302017-07-21T04:27:17+5:30

‘महापौर दबावाखाली काम करतात, त्यांनी स्वत:चे अधिकार वापरायला हवेत. कोणाच्याही तालावर भित्र्यासारखे काम करणे चुकीचे आहे, असे विधान महापालिकेच्या

Show in the square! | चौकात भेटा दाखवतोच!

चौकात भेटा दाखवतोच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : ‘महापौर दबावाखाली काम करतात, त्यांनी स्वत:चे अधिकार वापरायला हवेत. कोणाच्याही तालावर भित्र्यासारखे काम करणे चुकीचे आहे, असे विधान महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या माजी पक्षनेत्या मंगला कदम यांनी केली. त्यावर सभेनंतर महापौर नितीन काळजे यांनी या विधानाचा समाचार घेतला. ‘संबंधित सदस्या ज्येष्ठ आणि महिला आहेत. मी कोणाच्या दबावाखाली नाही. कोणत्याही पुरुषाने चौकात भेटावे. मी दाखवतोच कोण भित्रा आहे ते’ असे प्रत्युत्तर देऊन महापौरांनी खळबळ उडवून दिली.
महापालिकेची सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेत उपसूचनांच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली होती. विरोधी नगरसेवकांनी उपसूचनांच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरले. माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल आणि महापौर, स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. महापौरांना भित्रा म्हणणे ज्येष्ठ सदस्यांना शोभते का? भित्रा या शब्दाला सावळे यांनी आक्षेप घेतला.
सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘महापौरांबद्दल मंगला कदम यांनी अनुद्गार काढले आहेत. भित्रा आणि लायकी नाही, असे महापौरांना म्हणणे त्यांचा आणि सभागृहाचा, शहराचा अपमान आहे. विषय सोडून कोणीही बोलत असेल, तर चुकीचे आहे. असंसदीय शब्द मागे घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही महापालिकेचे सभागृह चालू देणार नाही.’’
सभागृहनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘रिंगरोडवर चर्चा करायची होती. आम्ही चर्चेला तयारही होतो. मात्र आपले बिंग फुटेल या भीतीने विरोधकांनी चर्चा होऊच दिली नाही. या प्रश्नाबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. रिंगरोडबाबत आम्ही नागरिकांच्या बरोबर आहोत. याबाबत विशेष सभा घेणार आहोत.’’
मंगला कदम म्हणाल्या, ‘‘विषय पूर्ण होण्यापूर्वीच विषय मंजूर करण्याची घाई कशासाठी सुरू होती. बोलायला लागल्यानंतर सभेचे कामकाज संपविण्यात आले. रिंगरोड, शहराचे बिघडलेले आरोग्य, पावसाळ्यात जलपर्णीबाबत काढलेले टेंडर या विषयावर बोलायचे होते. हे सर्व न होऊ देताच सभेचे कामकाज संपविण्यात आले, ही बाब चुकीची आहे. महापौर भीतीपोटी काम करतात. मीही महापौर होते. सर्वांना बोलण्याची संधी दिली होती. मी महापौरांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देत होते. मी कोणताही असंसदीय शब्द बोलले नाही.’’

विषयानुरूप चर्चा न करण्याचा विरोधकांचा होरा होता. आडमुठेपणा होता. रिंगरोडबाबत विशेष सभा घेण्यात येणार आहे. मी कोणाच्याही दबावाखाली किंवा कोणाच्या आदेशाने काम करीत नाही. मी कसे काम करायचे हे त्यांनी मला शिकवू नये. रिंगरोडवर त्यांनाच चर्चा होऊ द्यायची नव्हती. सन्माननीय सदस्यांनी जे शब्द वापरले, ते चुकीचे आहेत. कोणी पुरुषाने मला चौकात भेटावे; मग मी दाखवतोच भित्रा आहे की काय ते.
- नितीन काळजे, महापौर

सर्वसाधारण सभेत बोलू न देणे ही लोकशाहीची हत्या आहे. महापौर कोणत्याही पक्षाचे नसतात. एक सदस्य बोलत असताना सावळे आणि आशा शेंडगे मध्ये मध्ये बोलत होत्या. ज्या वेळी त्यांची संख्या तीन होती, त्याही वेळी आम्ही त्यांना कधी बोलताना अडविले नाही. कोणीही असंसदीय शब्द वापरले नाहीत. जे काहीजण असंसदीय शब्द आहेत, असे बोलतात; त्यांनी पाच वर्षांत काय आणि कसे शब्द वापरलेत, हे महापालिकेचे रेकॉर्ड तपासून पाहावे.
- योगेश बहल, विरोधी पक्षनेते

Web Title: Show in the square!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.