विनाहेल्मेट पोलीस दाखवा
By admin | Published: January 14, 2017 03:47 AM2017-01-14T03:47:58+5:302017-01-14T03:47:58+5:30
सर्वांनी स्वत:च्या जीविताच्या रक्षणासाठी हेल्मेट वापरलेच पाहिजे. हेल्मेटवापर पोलिसांसाठी बंधनकारक आहे. विनाहेल्मेट पोलीस
पुणे : सर्वांनी स्वत:च्या जीविताच्या रक्षणासाठी हेल्मेट वापरलेच पाहिजे. हेल्मेटवापर पोलिसांसाठी बंधनकारक आहे. विनाहेल्मेट पोलीस दिसल्यास त्याचा फोटो काढून आम्हाला पाठवा, त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. सध्या शहरातील हेल्मेट वापरणाऱ्यांचे प्रमाण २० टक्क्यांवर गेले असून, यंदाच्या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये हेल्मेटवापरावरच लक्ष केंद्रित केल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली.
शहर वाहतूक शाखेच्या वतीने ९ जानेवारी ते २३ जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हेल्मेटच्या वापराविषयी विशेष जनजागृती केली जात असल्याची माहिती शुक्ला व सहआयुक्त सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मुकुल माधव फौंडेशनच्या अध्यक्ष रितू छाब्रिया, वाहतूक शाखेच्या उपायुक्त कल्पना बारवकर उपस्थित होत्या.
रस्ते अपघातामध्ये विनाहेल्मेट मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांची सुरक्षा त्यांच्या परिवारासाठी आवश्यक आहे. एक अपघात संपुर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून जातो. स्वत:साठी नाही तर आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुलांसाठी तरी किमान हेल्मेट वापरा, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. येत्या १५ जानेवारी रोजी हेल्मेटविषयी जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. व गोल्फ कंपनीच्या वतीने पोलिसांना १,६०० हेल्मेट वाटण्यात येणार आहेत.
-रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त