किरकोळ कारणावरून पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 09:45 PM2018-06-18T21:45:26+5:302018-06-18T21:45:26+5:30
मित्राची मस्करी केल्याच्या व पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून सराईताने तरुणावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली.
पुणे : मित्राची मस्करी केल्याच्या व पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून सराईताने तरुणावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार खडकी येथे शनिवारी (१६ जून) रात्री दहाच्या दरम्यान घडला.
याप्रकरणी नऊ ते दहा जणांवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्विन उर्फ सोन्या बळीराम साठे उर्फ बिलाड, आण्या भिसे, प्रकाश आवळे, निलेश उर्फ सोनू नेसमनी (सर्व रा. खडकी) यांच्यासह पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गणेश सुंगत ( वय २४, खडकी) या तरुणाने तक्रार दिली आहे. यातील आश्विन, बिलाड याच्यावर यापूर्वी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सुंगत व त्याचे मित्र स्थानिक नगरसेवकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास गेले होते. त्यावेळी त्यांच्या वस्तीत राहण्यास असलेला आश्विन ,बिलाड, अण्या भिसे, प्रकाश आवळे, निलेश नेसुमणी व इतर पाच ते सहा जण समोरून येत होते. त्यांच्यासोबत गणेश याच्या ओळखीचा मित्र लखन परदेशी येताना दिसला. त्यामुळे फिर्यादीचा मित्री विठ्ठल बिडलाना त्याला पाहून मस्करीत म्हणाला की, तू यांचे सोबत पण फिरतो का? त्यावेळी बिलाड याने यापूर्वी त्यांच्यासोबत झालेल्या भांडणाचा व मस्करीचा राग मनात धरून गणेश व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करू लागला. त्यानंतर त्याला शिवीगाळ का करतो असे विचारल्यावर बिलाड व त्याचे साथीदार गणेश व त्याच्या मित्रांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना शिवीगाळ व मारहाण करू लागले. त्यानंतर बिलाड याने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तूल काढून ते लोड करत गणेश सुंगत व त्याच्या मित्रांच्या दिशेने रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करत आहेत.