भीमाशंकरला आजपासून श्रावणोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 01:40 AM2018-08-13T01:40:07+5:302018-08-13T01:40:29+5:30
श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असून दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी व पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होते.
भीमाशंकर - श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असून दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी व पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. यावर्षी रविवारपासून (दि. १२) श्रावण महिना सुरू झाला असून या पहिल्याच रविवारी भीमाशंकरला दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. पाऊस आणि दाट धुक्यात भाविकांनीतासन्तास दर्शनरांगेत उभे राहून दर्शन घेतले होते. मोठ्या प्रमाणात भाविक आल्याने सुमारे चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उद्या श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने भाविकांची येणारी संख्या बघता चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उद्यापासून श्रावणोत्सव सुरू होत आहे. पहिला श्रावण सोमवार असल्याने मोठ्या प्रमाणात भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता प्रशासनातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी दि. २०, २७ आॅगस्ट व ३ सप्टेंबर असे पुढील तीन श्रावण सोमवार आले आहेत. पहिल्याच रविवार झालेली गर्दी पाहता यावर्षी संपूर्ण श्रावण महिना भीमाशंकरला भाविकांची प्रचंड गर्दी राहणार, असे दिसते. जिल्ह्यात इतरत्र पाऊस नसला तरी भीमाशंकरमध्ये दाट धुके व मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे भीमाशंकरला पर्यटकांचा लोंढा वाढत आहे.
श्रावणी सोमवार यात्रेसाठी घोडेगाव व राजगुरुनगर पोलीस ठाण्यातर्फे चोख पोलीस बंदोबस्त नेमला आहे. सोमवारप्रमाणेच शनिवार व रविवारीदेखील जादा पोलीस नेमण्यात आले आहेत. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बंदोबस्त नेमण्यात आला आहे. श्रावणी सोमवार यात्रेसाठी एसटी महामंडळाने पुण्यातून जादा गाड्या ठेवल्या आहेत. तसेच विविध आगारांतूनही जादा गाड्या येत आहेत. देवस्थाननेही यात्रेनिमित्त तयार केली असून यात्रेकरूंना रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागू नये, यासाठी कळस दर्शनाची व्यवस्था केली आहे.
धुके आणि पावसात घेतले भाविकांनी दर्शन...
श्रावणी सोमवारी मंदिरात जास्त गर्दी राहू नये, दर्शन लवकरात लवकर व्हावे, यासाठी सकाळी ८ ते सायं. ५ वाजेपर्यंत मंदिरातील अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदिरातील पुजाºयांनी घेतला आहे.
वाहनतळ ते मंदिर या वाहतुकीसाठी यावर्षी एसटी महामंडळाने मिनीबस न दिल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. दोन मोठ्या एसटी गाड्या निगडाळे ते भीमाशंकरदरम्यान एकाच वेळेत जाऊ शकत नसल्याने या मार्गावर मिनीबसची गरज असते.
मिनीबस नसल्याने सुमारे चार किलोमीटरपर्यंत भाविकांना पायी जावे लागत आहे. प्रशासनाने खासगी मिनीबस लावून भाविकांची सोय करावी, अशी मागणी होत आहे.
1पुणे जिल्हयात सह्यादी्रच्या कुशीत हिरव्यागार वृक्षांनी वेढलेल्या जंगलात आंबेगाव व खेड तालुक्याच्या हद्दीवर श्रीक्षेत्र भीमाशंकर वसलेले आहे. भीमाशंकरचे मंदिर कोरीव काळ््या दगडामध्ये बाराव्या शतकाच्या मध्यकाळात बांधलेले आहे. या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. तसेच भीमाशंकरमधून भीमा नदीचा उगम झाला आहे. भीमाशंकर हे ठिकाण तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटनक्षेत्र म्हणून लोकांना आकर्षित करते.
2निसर्गाची मुक्त उधळण या परिसरात पाहावयास मिळते. १३० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले घनदाट सदाहरित हिरवेगार जंगल येथे आहे. या जंगलात शेकरू नावाची मोठी खार आढळते. तसेच जंगली प्राणी, पशु-पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे येथे आढळतात. पावसाळ््यात सतत धुक्याने हा परिसर व्यापलेला असतो. भीमाशंकर जंगलातील भोरगिरी या ठिकाणी कोटेश्वरचे मंदिर असून श्रावण महिन्यात येथेही दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात.
3हे मंदिर प्राचीन काळातील असून येथे अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. भोरगिरी गावाला लागूनच भोरगड हा किल्ला असून येथे जुन्या काळातील लेण्या आहेत. हा भोरगड व येथील धबधबे पाहण्यासाठी पावसाळ््यात पर्यटक येत असतात. तसेच जंगलातील गुप्तभीमाशंकर या ठिकाणी श्रावण महिन्यात अनेक भाविक दर्शनासाठी जातात. भीमाशंकरमध्ये श्रावण महिन्याबरोबरच महाशिवरात्री, चातुर्मास, त्रिपुरी पौर्णिमा या काळात यात्रा भरते. यातील श्रावण महिन्याची यात्रा पुरातन काळापासून सुरू आहे. पूर्ण एक महिना दर्शनासाठी भाविकांची येथे गर्दी असते.