इंदापूर नगरपरिषदेची श्रमदान चळवळ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:08 AM2021-07-11T04:08:36+5:302021-07-11T04:08:36+5:30
मंगळवारी नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी रामराजे कापरे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, नगरपरिषदेचे ...
मंगळवारी नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी रामराजे कापरे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांनी बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये वाढलेले गवत काढत दोन तास श्रमदान केले.
यावेळी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या समवेत उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची व माझी वसुंधरेची शपथ घेतली. त्यानंतर वेखंड, मारवा व सदाफुली या विविध आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड केली. याप्रसंगी नगरपरिषदेचे कर्मचारी शंभर टक्के उपस्थित होते.
नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, शहर हे आपले घर आहे, घरातील सर्व सदस्य म्हणजेच नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी घर जसे स्वच्छ आणि सुंदर ठेवतो, तीच भावना आपण सर्वांनी ठेवून सर्वांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तसेच आपल्या शहराचा माझी वसुंधरा व स्वच्छता अभियानात राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
शहर हरित करण्यासाठी श्रमदान चळवळीत सहभागी व्हा
इंदापूर शहराला आरोग्यदायी व स्वच्छ करण्यासाठी सर्व नागरिकांचा हातभार लागणे आवश्यक आहे. याचा खूप मोठा फायदा शहरातील नागरिकांना होणार असून, सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी, "माझे शहर माझी जबाबदारी" म्हणत नागरिकांनी व विविध स्वयंसेवी संस्थांनी वृक्ष लागवडीबरोबरच माझी वसुंधरा श्रमदान चळवळीत सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी राम राजे कापरे यांनी केले.
१० इंदापूर
इंदापूरमध्ये माझी वसुंधरा अभियानात सहभागी झालेल्या अंकिता शहा, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी.